पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लाॅक’ का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:50+5:302021-08-18T04:37:50+5:30
शोभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची पहिल्या लाटेत सुरू होताच साधारणत: एप्रिल २०२० पासून कोकण रेल्वे मार्गावरच्या ...
शोभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाची पहिल्या लाटेत सुरू होताच साधारणत: एप्रिल २०२० पासून कोकण रेल्वे मार्गावरच्या सर्वच गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर गणेशोत्सवाच्या कालावधीत गेल्या वर्षी ऑगस्टपासून काही गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा धोका सांगत दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या दोन पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या अजूनही बंद आहेत. मात्र, दामदुप्पट दर असलेल्या एक्स्प्रेस गाड्या भरमसाट सोडल्या आहेत. यातून कोरोना वाढत नाही का, अशी विचारणा सामान्य जनता करीत आहे.
दादर, दिवा पॅसेंजर रेल्वे दीड वर्षे बंदच
रत्नागिरीतून सुटणारी दादर (मुंबई) पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी या कोकण मार्गावर धावणाऱ्या दोन
पॅसेजर गाड्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे, म्हणजे एप्रिलपासून आतापर्यंत बंद आहेत. या गाड्यांचे प्रवास भाडे १०० रुपयांच्या आत असल्याने सामान्यांना या गाडीतून मुंबई प्रवास परवडणारा आहे. मात्र, सध्या या दोन्ही गाड्या बंद राहिल्याने सामान्यांचा प्रवास थांबला आहे.
एक्स्प्रेसचे दर दामदुप्पट
काही महिन्यापूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या गणेशोत्सव जवळ आल्याने भक्तांसाठी सुमारे १२० एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु या गाड्या आरक्षित असून त्याचे भाडेही ३०० ते ३५० असून पॅसेंजरच्या तुलनेने कितीतरी पटीने अधिक आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावर कोकण कन्या, तुतारी, मांडवी, जनशताब्दी, मंगला, तेजस आदींसह आता गणेशोत्सवासाठीच्या मिळून एकूण सुमारे १२० गाड्या धावत आहेत.
पॅसेंजर बंद; एक्स्प्रेस गाड्या धावतात सुसाट
सध्या कोकण रेल्वे मार्गावर पॅसेजर गाड्या जवळपास वर्षभर बंद असल्याने कोकणातील सामान्य नागरिकांना विशेष गाड्यांचा महागडा प्रवास करावा लागत आहे. सध्या पॅसेंजर बंद आणि एक्स्प्रेस सुसाट असे चित्र कोकण रेल्वे मार्गावर दिसत आहे. सामान्यांची पॅसेंजर गाडीची प्रतीक्षा कायम आहे.
रेल्वेचा ‘स्पेशल’ प्रवास परवडेना
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे या सामान्यांना तिकिटात दिलासा देणाऱ्या आहेत. रेल्वेचा प्रवास त्रासरहित आणि कमी पैशात करून देणारा असा आहे. आता सर्व निर्बंध उठले आहेत. मात्र, सामान्यांसाठी अजूनही पॅसेंजर साेडण्यात आलेली नाही. आणि स्पेशल गाड्यांचे भाडे परवडणारे नाही. गणेशोत्सवात तरी या गाड्या सोडाव्यात.
- श्रीधर साळवी, नागरिक, संगमेश्वर
रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांसाठी असलेली पॅसेंजर गाडी कित्येक महिन्यांपासून बंद ठेवली आहे. कोकण रेल्वे मार्गावर काही महिन्यांपासून स्पेशल गाड्या धावत आहेत, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका नाही का? मग पॅसेजर ही सामान्यांची गाडी बंद कशासाठी ठेवण्यात आली आहे. अजूनही ती सुरू करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही.
- रवींद्र सावंत, रत्नागिरी
देशातील सर्वच पॅसेंजर बंद आहेत. गणेशोत्सव आता जवळ आला आहे. त्यामुळे गणेशभक्त या गाडीची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, पॅसेंजरबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय रेल्वे बोर्डाला आहे.
- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे, रत्नागिरी