शिक्षकांच्या कोरोना ड्युटीचा अट्टहास कशासाठी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:28+5:302021-09-16T04:39:28+5:30
टेंभ्ये : गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या ...
टेंभ्ये : गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर व रेल्वे स्थानकावर तपासणी नाके लावण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र सध्या या नाक्यांवर चालणाऱ्या कामकाजाचा व याठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांचा विचार केला असता शिक्षकांना कोरोना ड्युटीचा अट्टहास का असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन शिक्षकांना अजून किती दिवस कोरोना ड्युटी लावणार आहे, असा उद्विग्न प्रश्न शिक्षकांमधून केला जात आहे. शिक्षकांची सर्व कोरोना ड्युटी रद्द करा व शाळा सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी अध्यापक संघाने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून तपासणी नाके लावण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर तसेच शहराच्या प्रवेशद्वारावर व रेल्वे स्थानकांवर हे तपासणी नाके कार्यरत आहेत. सध्या या तपासणी नाक्याचे कामकाज पाहता शिक्षकांना ड्युटी लावण्याचा अट्टहास आहे का, असा प्रश्न शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या तपासणी नाक्यांवर केवळ प्रवासी वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे नाव, मोबाईल नंबर व वाहनातील सदस्यांची संख्या नोंदवून घेतली जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या तपासणी नाक्यांवरही काहीअंशी फरकाने अशाच स्वरुपाचे काम चालू आहे. हे काम पोलीस कर्मचारीही करु शकले असते.
रेल्वे स्थानकावरील तपासणी नाक्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वेतून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची नोंद करणे केवळ अशक्य असल्याने जितके जमेल तितक्या प्रवाशांची नोंद करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. काहीवेळा या तपासणी नाक्यावर केवळ शिक्षकच पाहायला मिळतात. सध्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही शासनस्तरावरून निर्बंध घातले असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला असल्याचे बोलले जात आहे. शिक्षक गेली दोन वर्षे कोरोना ड्युटी करत आहेत. असे असतानाही गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून त्यांना वारंवार कोरोना ड्युटी लावली जात आहे.
विशेष बाब म्हणजे अद्ययावत माहिती नसल्याने एकाच शिक्षकाला पुन्हा पुन्हा ड्युटी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांना ड्युटी लावण्यासाठी प्रशासन अट्टहास करत आहे का, असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे.
................
अध्यापक संघाचे पत्र !
गणेशोत्सवानंतर कोविड रुग्णांच्या प्रमाणात वाढ न झाल्यास प्रत्यक्षरीत्या शाळा सुरू करण्याची परवानगी मिळावी व शिक्षकांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सध्या सुरू असणारी सर्व प्रकारची ड्युटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने नुकतीच केली आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची उद्दिष्टे शंभर टक्के साध्य होणे शक्य नसल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.