Nitin Gadkari: गडकरींचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाबाबतच का खाली पडताे; भास्कर जाधवांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:34 PM2022-01-18T14:34:56+5:302022-01-18T14:35:51+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गाेवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत अर्ज, विनंत्या हे मार्ग आता संपले आहेत. आता तीव्र व निर्णायक आंदाेलन असेल, अशी माहिती आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली. हा रस्ता का हाेत नाही, नितीन गडकरी यांचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाच्या कामाबाबतच का खाली पडताे, याचे आम्हालाही कुतूहल असल्याचे आमदार जाधव म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती. रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रही देण्यात आली आहेत. तरीही या कामाला गती आलेली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे लाेकप्रतिनिधी एकत्र आले असून, रखडलेल्या कामाबाबत आंदाेलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी चिपळूण येथे संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी उपस्थित हाेते.
आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, मुंबई - गाेवा महामार्गाचे काम का पूर्ण हाेत नाही, असे का हाेते आहे याचे कुतूहल आम्हालाही आहे़ नितीन गडकरी यांनी अलायमेंट न राहता, अॅक्विशेन न हाेता, त्याचा डीपी तयार नसताना चिपळुणातील उड्डाण पुलाचा भूमिपूजन केले. ताे पूलही हाेऊ शकलेला नाही. याचा अर्थ काय समजायचा? भूमिपूजन पूल करण्यासाठीच केले मग का पूल झाला नाही, असा प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केला. महामार्गाचे काम करण्याबाबत अर्ज, विनंत्या हे मार्ग आता संपले आहेत. आता तीव्र व निर्णायक आंदाेलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी २७ जानेवारीला रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत २२ राेजी बैठक घेण्यात येणार असून, आंदाेलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.