समाजात एवढा तणाव का वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:31 AM2021-03-17T04:31:45+5:302021-03-17T04:31:45+5:30
गेल्या वर्षभरात काेरोनाने जगाचे आर्थिक चक्र विस्कटून टाकले. कोरोनाने लाखो बळी घेतलेच; पण अनेकांचे रोजगारही हिरावून घेतले. यातूनही ...
गेल्या वर्षभरात काेरोनाने जगाचे आर्थिक चक्र विस्कटून टाकले. कोरोनाने लाखो बळी घेतलेच; पण अनेकांचे रोजगारही हिरावून घेतले. यातूनही उभारी घेत अनेकांनी आपली आयुष्ये सावरण्याचा प्रत्यत्न केला. अजूनही जगण्याशी सर्वांचाच संघर्ष सुरू आहे. कोरोनाची अनिष्ट सावली सोबत घेऊन साऱ्यांचाच प्रवास सुरू आहे. याक्षणी काय घडेल, याची चिंता साऱ्यांनाच सतावत आहे. जगणेच अशाश्वत झाल्याने समाजात ताणतणाव अधिक वाढायला लागलेत. त्यातूनच वैफल्य आल्याने अनेकांना मृत्यू जवळचा वाटतो, तर दिवसेंदिवस येणाऱ्या ताणातून हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांमध्ये वाढ होत आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहारावर होऊ लागल्याने विविध आजारांना निमंत्रण दिले जात आहे. ही वस्तुस्थिती आहेच; पण त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनातून येणाऱ्या ताणतणावांमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडू लागले आहे.
सध्याची अनिश्चित परिस्थिती पाहता यावर नियंत्रण आणणे कुठल्याच व्यक्तीच्या सध्यातरी हातात नाही. मात्र, प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल वाढविणे, यासाठी प्रत्यत्न करणे प्रत्येकाच्या हातात आहे. यापुढचा येणारा काळ अनेक आव्हाने घेऊन येणारा आहे. त्यामुळे ही आव्हाने पेलून पुढचा प्रवास करावा लागणार आहे. त्याकरिता समस्यांसोबत राहून त्यातून मार्ग काढतच जावे लागणार आहे. त्यासाठी सकारात्मकता असेल तरच यातून पुढे जाण्याचा मार्ग सापडणार आहे.
आधीच ताणतणावाचे आयुष्य जगत असतानाच सोशल मीडियामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. साेशल मीडियाचा उपयोग चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींसाठी अधिक होत आहे. त्यामुळे मनाची संभ्रमावस्था अधिक वाढू लागली आहे. दुर्दैवाने यात गुरफटणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानेच समाजात अनिश्चितेचे वातावरण अधिक निर्माण होत आहे. म्हणूनच स्वास्थ्य सांभाळणाऱ्यांनी सोशल मीडियावर किती रमायचं, हे ठरवावं. या मोहजालातून बाहेर पडून दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त कुटुंबात संवाद ठेवा. स्वत्:साठी एखादा छंद जोपासा. प्राप्त परिस्थिती स्वीकारून सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करा. मन हलकं होईल.