पेंढाबे, पिंपळीतील रुंदीकरणाचे काम आठ दिवसात होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:33 AM2021-04-23T04:33:52+5:302021-04-23T04:33:52+5:30
चिपळूण : गुहागर - विजापूर मार्गावरील पिंपळी बुद्रुक, पेंढाबे पुलाचे व रस्त्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी सुरू करण्यासाठी काँग्रेसचे ...
चिपळूण : गुहागर - विजापूर मार्गावरील पिंपळी बुद्रुक, पेंढाबे पुलाचे व रस्त्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी सुरू करण्यासाठी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांनी ४० ते ५० जणांचे शिष्टमंडळ घेऊन कंपनीच्या प्लांटबाहेर आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने नमते घेत येत्या आठ दिवसात काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुहागर - विजापूर मार्गावर पेंढाबे पूल व पिंपळी बुद्रुक याठिकाणी मनीषा कंपनीचे रस्ता चौपदरीकरण काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी कामच सुरू नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकींचे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत लब्धे यांनी सातत्याने आवाज उठवला. मात्र, त्याकडे मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी दुर्लक्ष केले. अखेर लब्धे यांनी ४० ते ५० जणांना घेऊन कंपनीच्या प्लांटबाहेर त्यांच्या गाड्या अडवल्या. याची माहिती मिळताच मनीषा कन्स्ट्रक्शनचे सदाशिव माने व शिवाजी माने यांनी घटनास्थळी येत लब्धे यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
यावेळी लब्धे यांनी सदाशिव माने यांना रस्त्याच्या कामासंदर्भात प्रश्न विचारून धारेवर धरले. यावेळी माने म्हणाले की, पुढील कामाचे डिझाईन होणे बाकी आहे, त्यामुळे काम थांबले आहे. पण लवकरच काम सुरू करणार आहोत. यावेळी लब्धे यांनी लवकर म्हणजे कधी लोकांचे जीव गेल्यानंतर का, आम्हाला नक्की कधी ते सांगा, त्याचबरोबर सती येथील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी तो सुरू कधी करणार? त्याचबरोबर गटारांचे बांधकाम सुरू असून, त्याची उंची मोठी आहे. त्यामुळे दुतर्फा राहणाऱ्यांना घरी जाणे-येणे अवघड बनले आहे. त्यादृष्टीने काही उपाययोजना करणार का, सती येथील पुलाचे काम करताना मोठ्या प्रमाणातील भराव समर्थ नगर येथे टाकण्यात आल्यामुळे पावसाळ्यात पाणी भरू शकते. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा विविध प्रश्नांवर लब्धे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सदाशिव माने यांनी यावेळी नमते घेत येत्या आठ दिवसात काम सुरू करण्यात येणार असल्याचे मान्य केले. यावेळी प्रकाश लब्धे, सुहास भोसले, मेजर शिंदे, केशव लांबे, नीलेश नारकर, सचिन खेडेकर, तात्या आपिष्टे, शंकर सावळकर, तेजस गावनग, अमीर कुटरेकर, अल्ली सय्यद, गोट्या पवार, नवाज खान, प्रसाद सावर्डेकर उपस्थित होते.
फोटो - काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत लब्धे व शिष्टमंडळाने ठेकेदाराला जाब विचारला.