रत्नागिरीत घरगुती वादातून पत्नीवर चाकूचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:30 AM2020-12-29T11:30:36+5:302020-12-29T11:34:48+5:30
Crime News RatnagiriNews-घरगुती वादातून पतीने पत्नीवर कांदा कापायच्या सुरीने पोटावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धवल कॉम्प्लेक्स आवारात घडली. आसावरी अमोल देसाई असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.
रत्नागिरी : घरगुती वादातून पतीने पत्नीवर कांदा कापायच्या सुरीने पोटावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धवल कॉम्प्लेक्स आवारात घडली. आसावरी अमोल देसाई असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसावरी सध्या ८ वर्षांच्या मुलासोबत माहेरी राहत होती. तर तिचा पती अमोल देसाइ हा महाड येथे एमआयडीसी येथे कामाला होता. त्याचे रत्नागिरीतील नाचणे येथे घर आहे. आठच दिवसापूर्वी तो घरी आला होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांचे पटत नसल्याने दोघेही वेगळे राहत होते.
सोमवारी सायंकाळी आसावरी बाजारात गेली होती. सायंकाळी धवल कॉम्प्लेक्स येथे ती परतली असता तिथेच इमारतीखाली पती उभा होता. तेथेच त्यांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्यावेळी अमोलने आधीच आणलेला कांदा कापायचा चाकू बाहेर काढून तिच्या पोटात खुपसला. त्यानंतर त्याने तिच्या हातावरही दोन वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी इमारतीखाली धाव घेऊन तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पती अमोल देसाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.