कोयत्याने वार करून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:43 PM2018-11-18T22:43:46+5:302018-11-18T22:43:51+5:30
लांजा : वेडाच्या भरात पतीने लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यात व अंगावर सपासप वार करून तिचा खून ...
लांजा : वेडाच्या भरात पतीने लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यात व अंगावर सपासप वार करून तिचा खून केला. ही घटना पन्हळे येथे रविवारी दुपारी घडली असून, संशयित म्हणून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत लांजा पोलीस यांनी दिलेली माहिती अशी की, पन्हळे आनंदगाव येथील समीक्षा संजय मसणे (वय ३२) सकाळी कपडे धुवून आल्यानंतर बेलाची उतरन या ठिकाणी आपल्या काजूच्या बागेत लाकूड आणण्यासाठी सकाळी अकरा वाजता गेली होती. तिचा पती संजय तुकाराम मसणे (३४) हा तिच्या पाठोपाठ जाताना त्याच्या धाकट्या भावजयने पाहिले आणि आपले सासरे तुकाराम यांना मोबाईलवर फोन करून याबाबत सांगितले.
संजय याचे वडील जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. धाकट्या सुनेचा फोन आल्यानंतर त्यांनी ती कुठे लाकडे आणण्यासाठी गेली आहे, याचा शोध सुरूकेला. समीक्षा हिच्या मागावर असलेल्या पती संजय याने बेलाची उतरण या ठिकाणी काजूच्या बागेत लाकडे आणण्यासाठी गेलेल्या पत्नीला गाठून प्रथम तिच्या डोक्यात दगड घातला. लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेला कोयता संजय याने हिसकावून घेतला अन् पत्नीच्या डोक्यावर, कानावर, डोक्याच्या खालच्या भागावर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली.
याच दरम्यान, तिचे सासरे तिचा शोध घेत होतेच. मात्र, सासरे
पोहोचण्याअगोदरच समीक्षावर हल्ला केल्याने ती तडफडत होती. शोध घेत बेलाची उतरण येथील काजूच्या बागेत पोहोचले असता त्यांना आपली सून रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत असल्याचे पाहिले. वडिलांची चाहूल लागल्याने संजय याने तेथून पळ काढला.
सुनेला वाचविण्यासाठी सासऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. रस्त्याच्या आजूबाजूला जनावरे चारण्यासाठी असलेल्या गुराख्यांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली. उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी तिला उचलली; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा मृतदेह घरी आणण्यात आला.
पन्हळे मसणेवाडीतील महिलेचा खून झाल्याची खबर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक विकास गावडे, उपनिरीक्षक पंडित पाटील, संदीप पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत जाधव, शांताराम पंदेरे, पांडुरंग खिल्लारे, दीपक कारंडे, चालक चेतन घडशी, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संशयित आरोपी संजय हा काहीच घडले नाही, अशा आविभार्वात होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संशय होताच, आता खरा ठरला
तो गेल्या आठ दिवसांपासून विचित्र वागत असल्याने हा काहीतरी घातपात करील असा संशय मृत समीक्षा हिच्या जावेला आल्याने तिने दीर समीक्षाच्या पाठोपाठ गेल्याची पूर्वकल्पना आपल्या सासºयांना दिली; मात्र तरीही समीक्षा वाचू शकली नाही. समीक्षा हिला एक पाच वर्षांची व तीन वर्षांची अशा दोन मुली आहेत.