अपंगांना घरघंटी वाटप करणार
By Admin | Published: March 9, 2015 09:23 PM2015-03-09T21:23:31+5:302015-03-09T23:54:19+5:30
सुभाष म्हस्कर : अंपग बाधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर
रत्नागिरी : अपंगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून त्यांना घरघंटी वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी डॉ. सुभाष म्हसकर यांनी दिली. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून अपंगांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यासाठी अपंगांसाठी खेळाच्या स्पर्धा, तीन चाकी सायकल वाटप व अन्य उपकरणे अपंगांना देण्यात येतात. त्यानंतर आता स्वयंरोजगार योजनेअंतर्गत अपंगांना घरघंटी देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. अपंगांना देण्यात येणाऱ्या घरघंटीमुळे त्यांना घरबसल्या व्यवसाय करता येणार आहे. त्यातून त्यांना आर्थिक फायदा होणार असून, स्वयंरोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यामुळे अपंगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठा हातभार लाभणार आहे. अपंगांना देण्यात येणाऱ्या घरघंटीसाठी समाजकल्याण विभागाने २३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही घरघंटी ९५ टक्के अनुदानातून देण्यात येणार आहे. लाभार्थीने केवळ ५ टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठी ग्रामस्तरावरुन प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. समाजकल्याण विभागाला केवळ ९० प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र, आणखी प्रस्तावांची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थींनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन डॉ. म्हस्के यांनी केले आहे. अशा योजनांसाठी संबंधितांनी पुढे यावे असे प्रयत्न सुरू झाले करावेत असे प्रयत्न करण्यात आले आहेत. (शहर वार्ताहर)