जिल्ह्याचे अर्थचक्र थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:01+5:302021-04-15T04:30:01+5:30
रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक ...
रत्नागिरी : शासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पुन्हा सर्व उद्योग, व्यवसाय, दुकाने, तसेच शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. त्यामुळे या पंधरा दिवसांत जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा थांबणार आहे.
देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या १३ हजारांच्या वर पोहोचली असून, मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या ४०० पेक्षा अधिक वाढली आहे. अजूनही काही दिवस ही संख्या वाढणार असल्याचा धोका आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आदी आवश्यक त्या नियमांचे पालन न केल्याने कोराेनाचा संसर्ग वाढला आहे. शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून बाधित होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता हा संसर्ग रोखण्यासाठीच राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून सुमारे दहा महिने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता विविध उद्योग, बांधकामे, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, शैक्षणिक संस्था, व्यायामशाळा, माॅल्स, आदी सर्व बंद होते. यामुळे या काळात या सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. काही महिन्यांपूर्वीच सर्व व्यवहार नियमित होत असतानाच आता पुन्हा १५ एप्रिलपासून पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकटाचा सामना करताना घायकुतीला आलेल्या या व्यावसायिकांना आता पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
त्यातच जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेरच पडू नये, यासाठी सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानेही यावेळी बंद राहणार आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे, तसेच शिमग्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाला पुन्हा लाॅकडाऊन करावे लागले. त्यामुळे आता पुन्हा जिल्ह्याचे आर्थिक चक्र पंधरा दिवस थांबणार आहे.