लांजात यावर्षी वन महाेत्सव कागदावरच राहणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:25+5:302021-06-21T04:21:25+5:30
लांजा : वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने ...
लांजा : वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात वन महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या याेजनेबाबत शासकीय स्तरावरच उदासिनता दिसत आहे. लांजा तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी कोणत्याही शासकीय कार्यालयाने रोपांची मागणी अद्याप वन विभागाकडे केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वन महोत्सव कागदावरच राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खासगी मालकीची आणि शेताच्या बांधावर, रेल्वेच्या दुतर्फा, कालवा, रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीक जमीन व गावरान जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.
या वन महोत्सवासाठी ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे, अशा यंत्रणांना रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी करायची आहे, असे असतानाही लांजा तालुक्यामध्ये मात्र अद्याप एकही शासकीय कार्यालयाने रोपांची मागणी वन विभागाकडे केलेली नाही. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या वन महोत्सवाबाबत शासन स्तरावरच उदासिनता आहे.
या योजनेचा लाभ सर्वसाधारण जनता, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे शासनातर्फे जाहीर केले असतानाही वन विभाग, लांजाकडून मात्र याबाबत कोणतीही जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे लांजा तालुक्यात वन महाेत्सवाबाबत अजूनही उदासिनताच दिसत आहे.