स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:34 PM2020-12-10T13:34:17+5:302020-12-10T13:38:00+5:30
Political, shivsena, ncp, ratnagirinews राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : राज्यातील सरकार बनवताना वापरलेल्या सुत्राप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही महाविकास आघाडी सामोरी जाणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार का, हाही प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी केली. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी हा पॅटर्न वापरला जाण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यानंतर अजून कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत. त्यातही चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगराध्यक्षांना पदावरून खाली आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी बनवली आहे. त्याखेरीज अजून हे तीन पक्ष कोठेही एकत्र आलेले नाहीत.
कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता मोठ्या प्रमाणात होत आहेत. पुढील आठवड्यात सरपंच आरक्षणाची सोडत निघणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, हीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडीची अपेक्षा आहे. मात्र, शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याने शिवसेनेत मात्र अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शिवसेनेची ताकद मोठी असल्याने होणाऱ्या निवडणुकांमध्ये वाटेकरी नकोत, असा एक मतप्रवाह असून, राज्य सरकारमध्ये सोबत असल्याने जिल्ह्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घ्यावे, असे मत काही कार्यकर्ते मांडत आहेत. आता नेते एकत्र येऊन यातून काही तोडगा काढतात का, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उभा राहिला आहे.
चिपळूण पंचायत समितीत महाविकास आघाडी
चिपळूण पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल सारखे आहे. येथेही महाविकास आघाडी करून पदांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या सभापती, उपसभापतींची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ द्यावी की नवी चेहऱ्यांना संधी द्यावी, याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते रत्नागिरीतील बैठकीत घेतील, असे खासदार विनायक राऊत यांनी याआधीच जाहीर केले आहे. हाच पॅटर्न इतरत्र राबवला जाणार आहे का, याची उत्सुकता कायम आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला वाटा नाही
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून राष्ट्रवादीला त्यात सामावून घेतली जाण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र तसे कोणतेच बदल झाले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे आता नेत्यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.
शिवसेना आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी होणे आवश्यक आहे. त्याबाबत पक्षाचे नेते, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम निर्णय घेतील. महाआघाडीसाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- बाबाजी जाधव,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस