शाळा दुरुस्ती रखडणार?
By admin | Published: July 17, 2014 11:44 PM2014-07-17T23:44:03+5:302014-07-17T23:53:42+5:30
जिल्हा परिषद : रत्नागिरी तालुक्यात ५८ वर्गखोल्या मोडकळीस
रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ प्राथमिक शाळांच्या ५८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव रत्नागिरी पंचायत समितीकडे देण्यात आले आहेत. प्रस्ताव पाठवले खरे, मात्र यासाठी जिल्हा परिषदेकडे आलेला निधीच अपुरा असल्याने यंदा या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या दुरुस्त होतील की नाही, हा प्रश्नच आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपये दरवर्षी करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या सर्वशिक्षा अभियानातून सुमारे एक ते दीड हजार वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र, आता या अभियानातून वर्गखोल्या बांधण्यासाठीचे अनुदान बंद करण्यात आले आहे.
रत्नागिरी पंचायत समितीकडून तालुक्यातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे प्रस्ताव शाळांकडून मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे करबुडे खापरेकोंड, करबुडे मूळगाव, कुरतडे नं. १, तरवळ - बौध्दवाडी, हरचिरी उर्दू, सैतवडे नं. १, कर्ला उर्दू मुलांची, कर्ला मराठी, वाटद नं. १, चवे निवई, देऊड गावातील, देऊड चाटवळ, कोतवडे वारेवाडी, तोणदे आगाशेकोंड, पाली नं. २, तरवळ नं. १, पन्हळी, कोळंबे धामेळे, रीळ, मालगुंड नं.१, खेडशी डफळचोळ, सोमेश्वर कीरबाग, गणेशगुळे, कशेळी नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, देऊड लावगण नं. २, गावखडी गुरववाडी, खानू नं. १, हातखंबा तारवेवाडी, वेळवंड नं. २, चांदोर नं. ५, पावस भाटीवाडी, खालगांव नं. २, वाटद खंडाळा, कोळंबे नं. ३, सांडेलावगण या प्राथमिक शाळांतील वर्गखोल्यांचा दुरुस्तीच्या प्रस्तावांमध्ये समावेश आहे.
या वर्गखोल्यांची दुरुस्ती जिल्हा वार्षिक योजनेतून आणि सेसफंडाच्या अनुदानातून करण्यात येते. वर्गखोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला शासनाकडून यंदा केवळ ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या तुटपुंज्या अनुदानातून रत्नागिरी तालुक्यातील दुरुस्तीची किती कामे होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून ही दुरुस्ती यंदा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. (शहर वार्ताहर)