रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला मिळणार दोन मंत्रिपदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:52 AM2019-10-28T00:52:33+5:302019-10-28T00:52:53+5:30
शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत
प्रकाश वराडकर
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेने पाचपैकी चार जागांवर विजय मिळवला. राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यातच १९९५मधील फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला राबविला जाण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला २ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी ४ आमदारांमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील भास्कर जाधव, उदय सामंत व राजन साळवी हे तीन विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. चिपळूणमधून सदानंद चव्हाण हे विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. मात्र, दापोलीत राष्टÑवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना पराभूत करून योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. गेल्यावेळी शिवसेनेला जिल्ह्यात ३ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी सेनेचे जिल्ह्यात ४ आमदार विजयी झाले आहेत.
शिवसेना-भाजप व मित्रपक्षांचे महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. भाजपची ही राजकीय अगतिकताही स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच शिवसेना सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. या पार्श्वभूमीवर दबाव तंत्राचा वापर शिवसेनेकडून सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला नक्कीच अधिक संख्येत व महत्त्वाची मंत्रीपदे येण्याची दाट शक्यता आहे. यातील मंत्रीपद आपल्या वाट्याला यावे, यासाठी जिल्ह्यातील चारही आमदारांकडून राजकीय फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा होत आहे.
शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. उदय सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपदाची धुराही यशस्वीरित्या सांभाळली आहे. या दोघांनीही त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत विधीमंडळात प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र, मंत्रीपद न भूषविताही गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटविणारे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांचाही पक्षनेतृत्वाला मंत्रीपदासाठी यावेळी विचार करावा लागणार आहे.
मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच
जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील अशी चर्चा असताना त्यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद असण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाचा अनुभव असलेले उदय सामंत व भास्कर जाधव तसेच विधीमंडळ कारभाराचा अनुभव असलेले आक्रमक आमदार राजन साळवी हे तिघेही कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार ठरू शकतात, अशीही चर्चा आहे.