कोकणात पक्ष संघटना बळकट करणार

By admin | Published: August 3, 2016 12:54 AM2016-08-03T00:54:36+5:302016-08-03T00:54:36+5:30

राजेंद्र गवई : वेगळ्या विदर्भाला ‘रिपब्लिकन’ही अनुकूल

Will strengthen the party organization in Konkan | कोकणात पक्ष संघटना बळकट करणार

कोकणात पक्ष संघटना बळकट करणार

Next

 रत्नागिरी : सद्यस्थितीत नागपूर विभागाला अनेक मंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्रीही याच विभागातील आहेत. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याला आपोआप अनुकूलता आली आहे. विदर्भ वेगळे राज्य व्हावे, याला आमच्या पक्षाचीही अनुकूलता आहे. त्याआधी या भागाचा विकासही होणे आवश्यक असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) चे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी आज सायंकाळी येथे मांडले.
कोकणचे नेतृत्व करणारे बी. व्ही. पवार यांचे निधन झाल्यानंतर कोकणातील पक्ष संघटनेकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे पक्ष संघटनेला पुन्हा बळकटी देण्यासाठी कोकणातील हा आपला दौरा असल्याचे गवई म्हणाले. येथील पक्ष कार्यकारिणी येत्या दोन दिवसात पूर्णत: बनवली जाईल. पक्षातर्फे शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले जाणार असून, बेरोजगारांसाठी नोकरी शिबिरेही घेतली जाणार आहेत. भाषणबाजी नको तर तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आपल्याला हवे आहेत.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा केवळ बौध्दांचा पक्ष नाही तर सर्वसमावेशक पक्ष असला पाहिजे. त्यासाठी पक्षाला व्यापक स्वरूप देऊन पक्ष मजबूत होऊ शकतो, असेही गवई म्हणाले. गटातटाच्या राजकारणामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले हे खरेच आहे. आम्ही सर्व गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही केले. मात्र, काही गटांना त्यांचे मित्रपक्ष आमच्यापेक्षा अधिक प्रिय आहेत, त्यामुळेच चळवळीची अशी स्थिती झाली आहे, असे गवई म्हणाले. (प्रतिनिधी)
आघाडीला इशारा : आम्ही ताकद दाखवून देऊ
कॉँग्रेसबरोबर येत्या निवडणूकांमध्ये आघाडीची तयारी आहे. परंतु ही आघाडी सन्मानजनक हवी. त्यासाठी आम्ही सोनिया गांधींपर्यंत पोहोचू. मात्र सन्मानजनक आघाडी झाली नाही तर आमचे धोरण हे ‘हम भी डुबेंगे, तुम्हे भी लेके डुबेंगे’ असे राहील, असा इशाराही राजेंद्र गवई यांनी दिला. गेल्या निवडणूकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने रिपब्लिकन पार्टीला न्याय देण्यात कुठेतरी चूक केली. भाजपने रामदास आठवले, सदाभाऊ खोत, जानकर यांना मंत्रीपदे दिली तर विनायक मेटेंना आमदारकी दिली आणि आपला शब्द पाळला आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला दिलेले शब्द पाळले नाहीत तर आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे ते म्हणाले.

 

Web Title: Will strengthen the party organization in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.