कोकणात रासप मजबूत करणार
By admin | Published: August 1, 2016 12:22 AM2016-08-01T00:22:15+5:302016-08-01T00:22:15+5:30
बाळासाहेब दोडतले : कापसाळ येथे कार्यकर्त्यांची बैठक
चिपळूण :कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची स्थिती मजबूत नाही. त्यासाठी गाव तिथे शाखा निर्माण हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपण राबवावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी समाजात वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी शुक्रवारी केले. यावेळी अशोक पवार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर राज्य कार्यकारिणीने सर्वच जिल्ह्यात पक्ष मजबूत होण्यासाठी दौरे सुरु केले आहेत. पक्षातर्फे बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष दादा केतकर, सुरेश बनकर, अनिल शेजाळ, नितीन धायगुडे, संतोष हिरवे, भगवान ढेंबे आदी उपस्थित होते.
सचिव दोडतले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. कोकणात पक्षाची स्थिती नाजूक आहे. मात्र, जानकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी सुचवलेली कामे होण्यास मदत होणार आहे. पक्ष बळकटीसाठी गाव तेथे शाखा हे अभियान सुरु करावे. जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी त्वरित नेमून जनतेची कामे करण्यावर भर द्यावा. विविध स्तरातील समाजाचे प्रश्न हाताळावेत. लोकांची कामे होण्यासाठी पाठपुरावा करावा. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. सदस्य नोंदणी जोमाने करावी, तसेच जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष म्हणून खेर्डीतील अशोक पवार यांची फेरनिवड केली, तर दाभोळ येथील संजय कलगुटकर व चिपळुणातील सुरेश पड्याळ या दोघांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. पक्षवाढीसाठी त्यांना सक्रिय राहण्याची सूचना केली. यावेळी राम नलावडे, संतोष माने, राजाराम पालांडे, परशुराम पवार, बाळासाहेब ढेंबे, डॉ. विलास शेळके, श्याम गवळी, दिनकर नलावडे, विष्णू दोडमनी, महेश पिसे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)