खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघातील गणिते बदलणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:55 PM2023-01-20T18:55:44+5:302023-01-20T18:56:15+5:30
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पुन्हा शिवसेनेत परतण्याची चर्चा
सुरेश पवार
दस्तुरी : राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. या बदललेल्या राजकारणात दापाेलीचे आमदार याेगेश कदम शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्या जाण्याने शिवेसेनेतच दाेन गट पडले असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खेड-दापाेली-मंडणगड मतदारसंघातील राजकीय गणित बदलत असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे या मतदार संघातील गणित आणखी बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता पाहायला मिळाली. अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. या सत्तांतरानंतर अनेक ठिकाणी स्थानिक परिस्थितीमध्येही बदल झाले. अनेक ठिकाणी पक्षांतराचे वारे वाहत आहेत.
आगामी २०२४ची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट व भाजप अशीच हाेण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटप होताना प्रामुख्याने विजयी उमेदवाराला प्रथम संधी दिली जाण्याची चर्चा आहे. दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये याेगेश कदम यांच्या रूपाने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्यास ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पुन्हा शिवसेनेत परतण्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्यांनी पुन्हा शिवबंधन हातात बांधले तर ठाकरे गटाकडून त्यांचा निवडणुकीसाठी विचार हाेण्याची चिन्हे आहेत. त्यातच शिवसेनेत दाेन गट निर्माण झाल्यानंतर जुन्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय कदम यांच्याशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. त्यातूनच त्यांनी पुन्हा शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तसे झाल्यास दाेन कदम पुन्हा एकमेकांसमाेर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.