रत्नागिरी गॅसमधील कामगार उपोषण करणार ?
By admin | Published: March 20, 2015 11:38 PM2015-03-20T23:38:54+5:302015-03-20T23:40:20+5:30
महाव्यवस्थापकांना इशारा : सोळा कामगार अन्यायाविरूध्द दाद मागणार
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सी अॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी २३ मार्चपासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. एन्रॉनविरोधी काम करणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीनेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पत्र प्रकल्पाचे महाव्यवस्थापकांना दिले आहे.
एन्रॉनविरोधी लढ्याची दखल जगभरामध्ये घेतली गेली. येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी लोकहक्क समिती स्थापन करुन एन्रॉनविरोधी कडवा संघर्ष केला. यामध्ये शेकडो लोकांचे जेलभरो झाले. आंदोलनातून अनेकदा मोठी तोडफोड होऊन उद्रेक निर्माण झाला. एन्रॉन म्हणजेच दाभोळ वीज कंपनीला पुनर्जीवित करुन रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाकडे अनेकवेळा स्थानिक कामगार भरतीचा प्रमुख मुद्दा तसेच प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादना वेळी झालेला अन्याय याबाबत वेळोवेळी चर्चा करुन व वेळप्रसंगी शेकडोच्या संख्येने आंदोलन करुन अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला गेला.
यामध्ये समितीचे प्रमुख यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे, प्रशांत शिरगावकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सी अॅण्ड एम फायनान्स विभागाच्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत अंजनवेलच्या सरपंचांकडे धाव घेतली. याकडे आता लोकहक्क समितीनेही लक्ष घालून कामगारांना न्याय मिळेपर्यंत या आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचे प्रकल्पाचे महाव्यवस्थापकांना पत्र देऊन कंपनी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
या निवेदनात म्हटले आहे की, कामगार भरती व कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत १९ डिसेंबर २०१४ला प्रकल्पावर मोर्चा काढल्यानंतर कंपनीच्यावतीने महाव्यवस्थापक कुणाल गुप्ता, सहाय्यक महाव्यवस्थापक एचआरचे कौल आदींसोबत लोकहक्क समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक यशस्वी होईल, अशी अपेक्षा वाटत असतानाच व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने आंदोलन निश्चित आहे. चर्चेमध्ये युपीएल व आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जानेवारी २०१५ च्या पहिल्या आठवड्यात चर्चा करण्याचे ठरवूनही यानंतर दुर्लक्ष करण्यात आले. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी मे. सिंग एंटरप्रायझेस या ठेकेदाराची ठेकेदारी मुदत संपल्यामुळे १ मार्च २०१५ पासून १६ कामगारांना कामावर कमी करण्यात आले. नवीन ठेकेदारीची प्रक्रिया पूर्ण करुन मे. के. डॅनियल यांना ठेकेदारी निश्चित करण्यात येऊनही वर्कआॅर्डर दिली नाही. नवीन ठेकेदारी दिली गेली नसल्याने या कामगारांना कमी करण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे कारस्थान रचत या कामगारांना कमी केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरुन अशा वागण्याचा परिणाम येथील शांत असलेले वातावरण बिघडेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे कंपनीच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आरजीपीपीएल, युपीएल अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात २३ मार्चला होणाऱ्या उपोषणाबाबत कंपनीचे मॅनेजर पांडे व अंजनवेलचे सरपंच यशवंत बाईत, वेलदूर सरपंच नंदकुमार रोहिलकर, माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी चर्चेने तोडगा काढण्याचा प्रयत्न असफल झाल्याने १६ कामगारांचे उपोषण होणार हे निश्चित आहे.
रत्नागिरी गॅसमधील सी अॅण्ड फायनान्स विभागातील.
स्थानिक कामगारांना न्याय देण्याची मागणी.
अंजनवेल सरपंचांनी केली व्यवस्थापकांशी चर्चा.
पर्याय न निघाल्याने कामगार आंदोलनावर ठाम.
प्रतीक्षा २३च्या आंदोलनाची.