वाऱ्याचा मारा आणि पावसाची संततधार थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:28+5:302021-05-18T04:32:28+5:30
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी ...
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश करताच जोराच्या वाऱ्याने आणि अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मात्र, सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर वारा आणि पावसाची संततधार थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी चार वाजल्यानंतर मात्र, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
शनिवारी सायंकाळपासून तौक्ते चक्रीवादळाने जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह सलामी देण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राजापुरात दाखल झाल्यानंतर सुमारे ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगाने पुढे सरकू लागले. त्यामुळे रत्नागिरी, जयगड असा प्रवास करत गुहागरकडे जाताना किनाऱ्यालगत तसेच आसपास १० किलोमीटर परिसरातील अनेक गावांना जोरदार फटका बसला. अनेक झाडे कोसळली. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने तसेच काही ठिकाणी जोरदार वाऱ्याने पोलच कोसळून पडल्याने दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर जोरदार वाऱ्याच्या माऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता.
सोमवारी सकाळीही पावसाचा जोर दिवसभर कायम राहणार असे, वाटत होते. मात्र, सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पावसाची संततधार थांबली त्याचबरोबर वाराही मंदावला. वातावरण मोकळे झाले. साडेअकरापासून सूर्यदर्शन होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी अधूनमधून गडगडाट होत होता. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तब्बल ११८९ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १३२.११ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली असून सर्वाधिक विक्रमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात २७४ मिलीमीटर तर त्याखालोखाल राजापूर तालुक्यात २०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.