येत्या २४ तासात वादळी पाऊस
By admin | Published: September 1, 2014 10:41 PM2014-09-01T22:41:11+5:302014-09-01T23:07:05+5:30
हवामान खाते : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण ८८२ मिलिमीटर, तर सरासरी ९८.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात १४५ मिलिमीटर झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचे तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यात टेरव येथील भागुजी बारकू कदम ही ३१ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० पासून बेपत्ता असून, ती वाहून गेल्याचा अंदाज आहे. याबाबत तपास सुरू आहे. गुहागर - वेलदूर रस्त्यावरील बांध कोसळला. मात्र, वाहतूक सुरळीत आहे. राजापूर तालुक्यात कोदवली नदीची पातळी ५.५० मीटर झाल्याने नगरपरिषदेमार्फत नागरिकांना भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु शहरात पाणी घुसल्याची नोंद करण्यात आलेली नाही. गुहागर तालुक्यातील ५ घरांमध्ये पाणी घुसल्याने १ लाख ६ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले असून, घरतवाडी तर्फ वेलदूर या गावातील रस्त्याची संरक्षक भिंंत कोसळली आहे. मंडणगड तालुक्यातील मौजे घुमरी येथे ३१ रोजी सायंकाळी ७.२० वाजता दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती, ती आज सुरू करण्यात आली आहे.
नांदिवडे - आंबूळवाडी येथे बोट बुडाली. या बोटीत असलेले सातही खलासी वाचले आहेत. संगमेश्वर तालुक्यात कोल्हापूर रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही वेळ बंद होती. खेड तालुक्यात मौजे उदय खुर्द येथे टेम्पो- एस. टी. -क्वालिसचा अपघात झाल्याने क्वालिसमधील दोघांचा मृत्यू झाला व दोन जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने दिली आहे. (प्रतिनिधी)
मच्छिमारांना इशारा...
जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून पुढील २४ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटीमीटरपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण नैऋत्येकडून तासी सुमारे ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहील. तसेच दक्षिण नैऋत्येकडून मोठ्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढील २४ तासांत मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान.
पावसामुळे जिल्हाभरात पूरसदृश स्थिती निर्माण.
सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात.
जिल्ह्यात सरासरी ८८२ मिलिमीटर पावसाची नोंद.
गुहागर तालुक्यातील पाच घरात पाणी घुसले.