सिंधुदुर्गात वादळी पाऊस
By admin | Published: June 19, 2015 12:13 AM2015-06-19T00:13:32+5:302015-06-19T00:18:05+5:30
बांद्याला चक्रीवादळाचा फटका : बारा लाखांची हानी; विजेचे खांब उन्मळून पडले
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी चक्रीवादळाचा बांदा शहराला फटका बसला आहे. अनेक झाडांबरोबरच विजेचे दहा खांब उन्मळून पडले आहेत, तर आचरा गाऊडवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे तसेच मातोंड येथील घरांचे व देवगड तालुक्यातील वाडा मुळबांध येथील गुरांच्या गोठ्याची अंशत: हानी झाली. जिल्हाभरात वादळी पावसामुळे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. हा नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर धोक्याची घंटा कायम असून, मच्छिमारांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७७.३८ मि.मी.च्या सरासरीने ६१९ मि.मी. पाऊस पडला. मालवण तालुक्यातील आचरा गाऊडवाडी भागात बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह आलेल्या पावसाने कमलाकर पांगे यांच्या घराचे छप्पर उडून ६० हजारांचे नुकसान झाले. घरातील अन्नधान्य, किमती वस्तू भिजून मोठ्या प्रमाणात हानी झाली. समुद्राच्या दिशेने आलेले वादळी वारे डोंगरभागाकडे सरकल्याने मोठी हानी टळली. कमलाकर पांगे यांच्या घराशेजारी राहणारे प्रशांत पांगे यांच्या स्लॅबच्या घरावरही आंब्याचे झाड पडले, परंतु सुदैवाने हानी टळली. वादळाचा जोर कमी होताच वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत कमलाकर पांगे यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केले. यावेळी नरेश तारकर, जगदीश पांगे, तानाजी पांगे, भाऊ गावकर, मोहन पांगे, जगदीश पडवळ, नारायण पडवळ यांनी पांगे कुटुंबियांचे अस्ताव्यस्त पडलेले सामान सुरक्षित जागेत हलविले.पांगे कुटुंबियांचा संसार पावसात भिजत होता. प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर, राजन पांगे, चंदन पांगे, जगदीश पांगे व जुबेर काझी यांनी पांगे कुटुंबियांचे घराचे छप्पर उभे करण्यासाठीचे काम हाती घेतले होते.
यावेळी आचरा गावचे तलाठी बी. जे. मुंबरकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचयादी केली. अनंत पांगे यांच्या घरावरही झाड पडून पडवीचे सुमारे २५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील आरती सामंत यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ९३ हजारांचे तर मातोंड येथील सुजाता कुडव यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ४ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद ओरोस येथील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नोंद झाली आहे. वाडा मुळबांध येथील जयवंत भिकाजी जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंबा कलमाचे झाड कोसळून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
बांद्याला चक्रीवादळाचा फटका
बांदा शहरातील लकरकोट, मिठगुळी परिसरात चक्रीवादळासह झालेल्या पावसाने कित्येक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्यात. वीज वितरण कंपनीचे तब्बल दहा विद्युत खांब उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला आहे. या चक्रीवादळाने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.