शिवसेनेने उदय सामंत समर्थकांना दाखविला बाहेरचा रस्ता, तत्काळ नव्याने नियुक्त्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:41 PM2022-07-11T18:41:53+5:302022-07-11T18:42:25+5:30
आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता
रत्नागिरी : शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातील आमदारांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता त्यांचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून पायउतार केले जात आहे. दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. या बंडात शिवसेनेचे ४० आमदारही सहभागी झाले हाेते. त्यामध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे याेगेश कदम यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दाेन आमदार शिंदे गटात सामील हाेताच शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट बंडखाेर आमदारांचे समर्थन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दापाेलीचे आमदार याेगेश कदम यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेचे स्वप्नील पारकर यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाईचे शस्त्र उचलले आहे.
आमदार सामंत गुवाहाटीत गेल्यानंतर रत्नागिरीत झालेल्या बैठकीत युवा तालुका अधिकारी तुषार साळवी व उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांनी उघडपणे पाठिंबा दिला हाेता. या बैठकीचा अहवाल मुंबईत पाठविला हाेता. त्यानंतर तुषार साळवी आणि केतन शेट्ये यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. येत्या काही दिवसांत आणखीही काही पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नवीन नियुक्त्या
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागेवर तत्काळ नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका युवा अधिकारीपदी मिरजाेळेचे वैभव पाटील, तर उपजिल्हा युवा अधिकारीपदी पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातही बदल?
शहरातील काही पदाधिकारी आमदार सामंत यांचे समर्थन करीत आहेत. त्यांचीही पदे धाेक्यात आली आहेत. शहराची जबाबदारी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या आणि पुन्हा आमदार सामंत यांच्यासाेबत शिवसेनेत आलेल्या एका पदाधिकाऱ्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आमदार सामंत यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची साथ कधीच साेडणार नाही, ते जाे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहणार आहे. आमचा विश्वास काल, आज आणि उद्याही फक्त त्यांच्यावर राहणार आहे. - तुषार साळवी, माजी तालुका युवा अधिकारी