पत्रकार वारिशे मृत्यूप्रकरण: मारेकऱ्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी?, संजय राऊतांची विशेष तपासाची मागणी

By मनोज मुळ्ये | Published: February 17, 2023 01:27 PM2023-02-17T13:27:33+5:302023-02-17T13:29:59+5:30

आंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही.

With which rulers is the killer connected? MP Sanjay Raut demanded a special investigation into the death of journalist Varishe | पत्रकार वारिशे मृत्यूप्रकरण: मारेकऱ्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी?, संजय राऊतांची विशेष तपासाची मागणी

पत्रकार वारिशे मृत्यूप्रकरण: मारेकऱ्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी?, संजय राऊतांची विशेष तपासाची मागणी

Next

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचे नेमक्या कोणत्या सत्ताधारी व्यक्तीशी लागेबांधे आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. एसआयटी स्थापन केली आहे. पण त्यांनी दबावाशिवाय तपास करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील बरीच माहिती आपल्याकडे आहे आणि ती आपण एसआयटीला देऊ, असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरीमध्ये केले.

पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांनी भेटण्यासाठी खासदार राऊत आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली.

रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणतात की, पंढरीनाथ आंबेरकर याने प्लान करुन खून केला. पण प्लान एकट्याने होत नाही. या प्लानमध्ये कोण कोण आहेत? आंबेरकर याला वारिशे यांच्याबाबत कोण माहिती देत होते? अशा अनेक गोष्टी आहेत. त्या आतापर्यंतच्या तपासात का आल्या नाहीत? आता एसआयटीच्या तपासात या गोष्टी पुढे याव्यात, असे अपेक्षित असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आंबेरकर हा जमिनींचा दलाल होता. त्यात अनेक प्रमुख राजकीय लोकांचे जागांचे बेनामी व्यवहार त्याने केले आहेत. माझी एक इंच तरी जागा दाखवा, राजीनामा देतो, असे कोणी राजकीय नेते सांगत असले तरी त्यांच्या बेनामी जागा आहेत. त्यातून ही हत्या झाली आहे का? याआधीही चार लोकांना आंदोलन न करण्यासाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचीही चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.

आंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही. त्यामुळे वारिशे यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये द्यावेत, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे राऊत यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, आमदार राजन साळवी तसेच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजापूर तालुक्यातील कशेळी येथे जाऊन शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Web Title: With which rulers is the killer connected? MP Sanjay Raut demanded a special investigation into the death of journalist Varishe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.