महिनाभरात रत्नागिरीत १६ व्यक्ती आल्या इंग्लंडमधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 PM2020-12-30T16:25:45+5:302020-12-30T16:27:33+5:30
CoronaVirus Ratnagiri-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.
कोरोनाचे संकट कमी होते न होते तोच इंग्लंडमधील या नव्या विषाणूने पुन्हा आव्हान निर्माण केले असून, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आलेल्या परदेशी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.
२५ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत १६ व्यक्ती इंग्लंडमधून आल्या आहेत. या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करून स्वॅब घेण्यात आले होते. त्यांपैकी १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांचे २८ दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे.
एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले?
एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९३० विदेशी आले. कोरोनाच्या काळात ग्रामकृती दलाच्या माध्यमातून अशा व्यक्तींची माहिती घेतली जात होती. त्याचप्रमाणे परदेशांतून येणाऱ्या व्यक्तींचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
विदेशातून येणाऱ्यांची यादी देशाकडून राज्यांना पाठविली जात आहे. राज्यांकडून या व्यक्ती ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, त्या जिल्ह्यांकडे यादी पाठविली जाते. त्यानंतर या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहितीही आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.
आरोग्य विभाग सतर्क
जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची माहिती घेतली जात असून, त्यांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६ व्यक्ती परदेशातून आल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरु आहे. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. बबिता कमलापूरकर,
आरोग्य अधिकारी