Ratnagiri: आंजणारी घाटात भरधाव कंटेनरने चिरडले, महिला जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:38 AM2023-11-24T11:38:36+5:302023-11-24T11:38:50+5:30
पाठलाग करुन चालकाला पकडले
लांजा : मजुरी कामासाठी चालत जाणाऱ्या महिलांना भरधाव कंटेनरने चिरडले. यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजता मुंबई-गाेवा महामार्गावरील आंजणारी घाटात (ता. लांजा) घडली. पल्लवी प्रकाश पेंढारी (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जयश्री धोंडुराम पेंढारी (५५, दाेघीही रा. आंजणारी पेंढारीवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
पल्लवी पेंढारी व जयश्री पेंढारी या माेलमजुरी करतात. त्या गुरुवारी आंजणारी पूल येथील चांदोरकर यांच्याकडे मजुरी कामासाठी सकाळी आठ वाजता घरातून निघाल्या. आंजणारी बसथांब्याजवळील तीव्र उतारावरील खिंडीत त्या सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान आल्या. त्याचवेळी लखनौहून गोव्याच्या दिशेने सद्दाम हकमुद्दीन अन्सारी (३६, रा. बिहार, जि. कैमुर भाऊबा, तहसील चैनपूर) हा कंटेनर (एचआर ३८, व्ही ९७९४) घेऊन जात हाेता.
आंजणारी घाट उतरल्यानंतर चालत जाणाऱ्या महिलांना कंटेनरची धडक बसली. कंटेनरच्या धडकेने पल्लवी पेंढारी यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत जयश्री पेंढारी या कंटेनरच्या धडकेने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पाली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पल्लवी पेंढारी यांच्या मृतदेहाचे लांजा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलिस सहायक निरीक्षक प्रवीण देशमुख, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, साक्षी भुजबळराव, रहिम मुजावर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, गिरी गोसावी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताचा पंचनामा केला. कंटेनरचालक सद्दाम हकमुद्दीन अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंटेनरचालकाचा पाठलाग
अपघातानंतर कंटेनरचालक सद्दाम अन्सारी याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून देवधे (ता. दापाेली) येथे पकडला. त्यानंतर त्याला पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आईचे छत्र हरवले
अपघाती मृत्यू झालेल्या पल्लवी पेंढारी यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा आहे. एक मुलगी बारावी झाली असून, दुसरी बारावीत शिकत आहे तर मुलगा दहावीत आहे. आईचे छत्र हरपल्याने ही मुले पाेरकी झाली आहेत.