Ratnagiri news: 'माहेर'मुळे 'ती'ला मिळालं हक्काचं घर अन् माणसं
By शोभना कांबळे | Published: March 15, 2023 04:57 PM2023-03-15T16:57:05+5:302023-03-15T16:59:38+5:30
पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक संबंधित महिला निराधार, मळकट कपड्यात आढळून आली होती
रत्नागिरी : भटकत असलेल्या महिलेला येथील माहेर संस्थेच्या प्रयत्नामुळे मानसिक आजारावर उपचार मिळाले. ती बरी झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर तिला हक्काचे घर व माणसे मिळाली. तिच्या पतीने संस्थेत येऊन या महिलेला आपल्या घरी नेले.
रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित मुले- मुली महिला, पुरुष दाखल होत असतात. रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या, मानसिक विकार असलेल्या महिला संस्थेत दाखल होऊन औषध उपचाराने बरे होतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे पुण्यावरून येत असताना पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक एक निराधार, मळकट कपड्यातील महिला दिसली. त्यांनी तिची विचारपूस करून औषध उपचार व निवाऱ्याची गरज ओळखून माहेर संस्थेच्या गाडीतून संस्थेत दाखल केली.
तिचे पुढील उपचार ओपीडी बेसवर रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आले. पाच महिन्यात ही महिला बरीही झाली व तिने आपले नाव येसाबाई दगडू एकशिंगे (भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर) असे सांगितले. या पत्त्यावर चौकशी केली असता येसाबाई एकशिंगे यांचे पती यांनी येसाबाई ही आपली पत्नी असल्याचे सांगितले.
गेली पाच सहा महिने ती घरातून बाहेर पडली आहे. तसेच ती मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने गाव सोडून बाहेर जाते परंतु पुन्हा ती घरी येते. परंतु यावेळी खूप दिवस झाले ती घरी आलीच नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आम्ही तिचा खूप शोध घेत होतो. परंतु ती सापडली नाही, असे सांगितले. येसाबाईलाही घरी जाण्याची ओढ लागली होती. त्यांचे पतीने माहेर संस्था हातखंबा येथे येऊन येसाबाई शिंदे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले. माहेर संस्थेमुळे एका निराधार भटकणाऱ्या महिलेला आपले घर मिळाल्याने खूप समाधान वाटले असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.