फिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:29 PM2020-11-21T15:29:01+5:302020-11-21T15:34:28+5:30

crimenews, police, rajapur, ratnagirinews राजापूर तालुक्यातील पाचल -मुस्लिमवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात खुद्द फिर्यादी असलेली अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, पैशांसाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने दिली आहे.

The woman who filed the complaint was the real thief | फिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोर

फिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोर

Next
ठळक मुद्देफिर्याद देणारी महिलाच निघाली खरी चोरपाचलमधील चोरीचा लागला २४ तासात छडा

राजापूर : तालुक्यातील पाचल -मुस्लिमवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात खुद्द फिर्यादी असलेली अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, पैशांसाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने दिली आहे.

यातील चोरीला गेलेला ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या महिलेने पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार स्वीकारताच पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडकाकेबाज कामगिरी करत अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला. याप्रकरणी महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला चोरट्याने घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करत सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद पाचल - मुस्लिमवाडी येथील अफसाना ताजुद्दीन टिवले यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली होती.

या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरीहून श्वान पथकालाही पाचारण केले होते. श्वानपथकाचे प्रमुख भूषण राणे यांनी तत्काळ घटनास्थळी श्वानासह येत पाहणी केली असता, श्वान घरातच या फिर्यादी महिलेभोवती घुटमळत होता. घरातून तो बाहेरच जात नव्हता. त्यामुळे या फिर्यादी महिलेबाबतच शंका आल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.

घरातील मंडळींनाही याबाबत विश्वासात घेत पोलिसांनी या महिलेला विचारणा केल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने अखेर आपणच चोरी केल्याची कबुली दिली. पैशांची गरज असल्याने आपण हा चोरीचा बनाव केल्याचे नमूद करत दिराच्या कपाटातील रोख रक्कम व दागिने आपण चोरल्याचे या महिलेने सांगितले. मात्र, त्यांच्याच कपाटातील दागिने व रोख रकमेची कशी चोरी झाली, याची कुणाला काही शंका येऊ नये म्हणून आपलेही दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचा बनाव केल्याचे या महिलेने पोलिसांनी सांगितले.

रायपाटण दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांची नुकतीच बदली झाली असून, रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तळेकर यांनी पदभार स्वीकारताच चोरीचा २४ तासात तपास लावत कार्यपद्धतीची चुणूक दाखवली आहे. राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अनंत तिवरेकर, भीम कुळी, किरण सकपाळ यांनीही विशेष कामगिरी केली आहे. या चोरीच्या तपासात श्वान पथकाचे भूषण राणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे तळेकर यांनी सांगितले.

अटक आणि कोठडी

चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या महिलेकडून हस्तगत केला आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: The woman who filed the complaint was the real thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.