अजबच! रत्नागिरीत कोरोनाने मृत झालेली महिला पोर्टलवर चक्क जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 02:17 PM2022-01-10T14:17:29+5:302022-01-10T14:18:14+5:30

रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेला पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील महिला रुग्णालयात घडला. या प्रकारानंतर महिलेच्या पतीने ...

The woman who was killed by Corona in Ratnagiri is quite alive on the portal | अजबच! रत्नागिरीत कोरोनाने मृत झालेली महिला पोर्टलवर चक्क जिवंत

अजबच! रत्नागिरीत कोरोनाने मृत झालेली महिला पोर्टलवर चक्क जिवंत

googlenewsNext

रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेला पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील महिला रुग्णालयात घडला. या प्रकारानंतर महिलेच्या पतीने माझी पत्नी बरी झाली. तिला डिस्चार्ज दिला असे दाखविले मग हे मृत्यूचे प्रमाणपत्र कसे काय दिले, मला माझी पत्नी द्या, असे सांगताच महिला रुग्णालयातील डॉक्टरांसह साऱ्यांनाच घाम फुटला.

काेराेनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना शासनाने ५० हजार रुपये देण्याची घाेषणा केली आहे. या मदतीसाठी प्रस्ताव सादर करताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

रत्नागिरीतील महिला रुग्णालयात शहरातील एका ४५ वर्षीय महिलेचा ३ जून २०२१ राेजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पतीला मृत्यू दाखलाही देण्यात आला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या यादीत आपल्या पत्नीचे नाव नसल्याचे या पतीला कळले. त्यानंतर त्या पतीने थेट जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, तिथून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे जा, असे सांगण्यात आले.

त्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून या तक्रारदाराला तुमच्या पत्नीचा मृत्यू कुठे झाला आहे, असे विचारण्यात आले. ज्या रुग्णालयात मृत्यू झाला त्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. पती महिला रुग्णालयात गेला असता चक्क कोरोनाने मृत झालेल्या या महिलेला रुग्णालयाच्या पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचे दाखविण्यात आले आहे. माझ्या पत्नीला पोर्टलवर डिस्चार्ज दाखवलंय म्हणजे माझी पत्नी जिवंत आहे. मग मला तुमच्या रुग्णालयाने हे प्रमाणपत्र कसले दिले आहे, असा प्रश्न पतीने केला.

माझी पत्नी रुग्णालयात होती आणि तुम्ही डिस्चार्ज दिलाय असा उल्लेख पोर्टलवर केला आहे, माझी पत्नी मला परत द्या!, असे सांगताच महिला रुग्णालयातील डॉक्टरांसह साऱ्यांनाच घाम फुटला.

कोरोनामध्ये मृत झालेली महिला चक्क जिवंत दाखविण्याचा प्रयत्न डिस्जार्ज या वाक्यातून झाला आहे. दोषी ठरवायचं कुणाला, असा प्रश्न असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र तोंडावर बोट ठेवले आहे.

मदतीपेक्षा कागदपत्रच अधिक

शासनाने कोरोनामध्ये दगावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना ५० हजारांची मदत जाहीर केली. मात्र, हे ५० हजार रुपये मिळविण्यासाठी सतराशेसाठ कागदपत्रांची अट घातली आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी रुग्णालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे.

न्यायालयात जाणार

मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी, त्यातच पत्नी गेल्याचे दु:ख या विचारात असलेल्या या पतीला या प्रकारामुळे नाहक वेदना झाल्या आहेत. प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय या तक्रारदार पतीने घेतला आहे.

Web Title: The woman who was killed by Corona in Ratnagiri is quite alive on the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.