मंगलोर एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:19+5:302021-05-04T04:14:19+5:30
खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी मंगलोर एक्स्प्रेस तालुक्यातील कळंबणी रेल्वे स्थानकात आली असता एका महिलेची बॅग अज्ञाताने ...
खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी मंगलोर एक्स्प्रेस तालुक्यातील कळंबणी रेल्वे स्थानकात आली असता एका महिलेची बॅग अज्ञाताने चोरल्याची घटना ५ एप्रिल राेजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या बॅगेत सुमारे तीन लाख ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज हाेता.
या चोरीप्रकरणी रेखा रंगा नाईक (रा. लोणावळा, जि. पुणे) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार त्या दि. ५ एप्रिल रोजी मंगलोर एक्स्प्रेसमधून कोच क्रमांक २ मधील आसन नंबर ५७ वर बसून मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करीत होत्या. मंगलोर एक्स्प्रेस खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक रेल्वे स्टेशन येथे मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास आली असता अज्ञाताने त्यांची हँडबॅग पळवून नेली. या बॅगेत सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण तीन लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज व पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, आदी महत्त्वाची कागदपत्रे होती. या घटनेची माहिती रेखा नाईक यांनी रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. या प्रकरणी पुढील तपासासाठी गुन्हा खेड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.