Rantagiri: रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट, बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता
By मनोज मुळ्ये | Published: April 25, 2023 09:24 AM2023-04-25T09:24:47+5:302023-04-25T09:25:25+5:30
Anti-Refinery Movement In Barsu: बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
- मनोज मुळ्ये
राजापूर - बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. मात्र मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी पोलिसांना घटनास्थळापर्यंत जाण्याच्या मार्गावरच अडवले. अनेक आंदोलनकर्त्या महिला रस्त्यावर झोपून राहिल्या होत्या.
रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेले बारसू भागातील मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी आधीपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात केला जात आहे. काही पोलिस सोमवारीच बारसू परिसरात दाखल झाले होते. मंगळवारी पोलिसांच्या आणखी काही गाड्या बारसूमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या.
सर्वेक्षण प्रक्रियाबाबत होणाऱ्या हालचाली लक्षात घेऊन काही ग्रामस्थ सोमवारी सायंकाळपासूनच बारसूच्या माळरानावर थांबले होते. अनेक ग्रामस्थ मंगळवारी पहाटेपासून या माळरानावर दाखल झाले. या लोकांनी पोलिसांचा रस्ता अडवला. ग्रामस्थ रस्त्यावर बसून होते तर अनेक महिला रस्त्यावर झोपल्या होत्या. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या एकूणच प्रकारामुळे बारसू परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.