रिफायनरी, आयलॉग पोर्ट प्रकल्पांच्या समर्थनासाठी नाटे येथे महिला एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:21+5:302021-09-06T04:36:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन गेल्या काही दिवसात वाढत असून, या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन गेल्या काही दिवसात वाढत असून, या प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि बुद्धिजीवी लोक एकत्र आले आहेत. हा प्रकल्प राजापुरातच झाला पाहिजे, अशी मागणी करत आहेत. प्रकल्पाच्या समर्थनार्थ महिलाही पुढे सरसावल्या असून, रविवारी तालुक्यातील नाटे भागातील शेकडो महिलांनी पुढे येत आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा दिला.
नाटे भागातील अनेक महिला आमच्या भागात प्रकल्प आला पाहिजे, आमच्या मुलाबाळांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे, आमच्या सर्व लोकांना रोजगार आरोग्य व शिक्षण यासारख्या चांगल्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी करत राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला आयलॉग जेटी असेल वा रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प असेल हे राजापुरात झालेच पाहिजेत, अशी मागणी केली. कोणत्याही राजकीय पक्ष, पुढारी यांच्या नेतृत्वाशिवाय या परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत या प्रकल्पाचे समर्थन केले आहे.
या महिलांच्या आंदोलनामध्ये या भागातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुखही सहभागी झाले होते. यामध्ये अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे माजी विभागप्रमुख डॉ. सुनील राणे, विद्यमान उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, शाखाप्रमुख महेश कोठारकर, शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटांच्या प्रतिनिधी मनाली करंजवकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुतिका बांदकर, सुबोध आंबोळकर, माजी मुख्याध्यापिका शहाणे, युवासेना शाखाप्रमुख सचिन बांदकर, माजी सरपंच संजय बांदकर, दत्ताराम थलेश्री, रमेश थलेश्री आदींसह नाटे, राजवाडी येथील प्रातिनिधिक महिला व कार्यकर्ते समर्थनार्थ सहभागी झाले होते.