सावर्डे गणातील महिला बनताहेत स्वावलंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:10+5:302021-04-28T04:34:10+5:30
चिपळूण : महिला बालकल्याण विभागातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना महिलांच्या गरजा, प्रशिक्षणातील आवडीनिवडींना तितकेसे स्थान मिळत नव्हते. मात्र यावेळी माजी ...
चिपळूण : महिला बालकल्याण विभागातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना महिलांच्या गरजा, प्रशिक्षणातील आवडीनिवडींना तितकेसे स्थान मिळत नव्हते. मात्र यावेळी माजी सभापती व विद्यमान सदस्या पूजा निकम यांनी सावर्डे गणात १५ व्या वित्त आयोगातून महिलांच्या गरजेनुसार योजना आखली. त्यासाठी सर्व्हेक्षण करून लाभार्थ्यांची निवड केली. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आता आर्थिकदृष्ट्या समृद्धीकडे वाटचाल करू लागल्या आहेत.
पंचायत समिती महिला बाल कल्याण विभाग, वित्त आयोग निधीतून कधी कधी वस्तूंचा पुरवठा केला जातो; तर कधी विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. तालुक्यासाठी शक्यतो एकच फॉरमॅट ठरलेला असतो. माजी सभापती निकम यांनी वेगळी संकल्पना राबविली. सेस फंडातून सावर्डे गणासाठी मिळणाऱ्या निधीतून त्यांनी स्वतःच योजना तयार केली. संगणक प्रशिक्षण, शिवणकाम, मेहंदी, ब्यूटी पार्लर, विणकाम या प्रशिक्षणासाठी त्यांनी सावर्डे गणातील गरजू महिला प्रशिक्षणार्थीचे सर्व्हेक्षण केले. कोणत्या महिलेस कोणत्या व्यवसायात आवड आहे, याची माहिती घेत आराखडा तयार केला. त्यानुसार महिलांच्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी माणदेशी फाऊंडेशनने प्रशिक्षक उपलब्ध करून दिले.
संगणक प्रशिक्षणासाठी बी. एस्सी. आयटी सह्याद्री कॉलेजने लॅब उपलब्ध करून दिली; तर टेलरिंग कोर्ससाठी आयटीआय कॉलेजने मशीन दिल्या. मेहंदी, पार्लर प्रशिक्षणासाठी कॉलेजचा हॉल मिळाला. यामुळे १०-१० महिलांची बॅच करून त्यांना सुलभपणे प्रशिक्षण मिळण्यास मदत झाली. सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, डी. वाय. कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेटी देत प्रशिक्षणाचे कौतुक केले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलाही आता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय सुरू करू लागल्या आहेत. एखाद्या गणात गरजू महिलांचे सर्व्हेक्षण, त्यांच्या आवडीनिवडी ओळखून तालुक्यात प्रथमच असे प्रशिक्षण दिले जात आहे.