रत्नागिरीत महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:54 PM2020-01-19T23:54:29+5:302020-01-19T23:54:41+5:30
रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटल्या की, पुरूषांची मक्तेदारी. यापूर्वी या स्पर्धा पुरूषासाठी सिमित होत्या. मात्र, या स्पर्धेतही महिलांनी शिरकाव ...
रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धा म्हटल्या की, पुरूषांची मक्तेदारी. यापूर्वी या स्पर्धा पुरूषासाठी सिमित होत्या. मात्र, या स्पर्धेतही महिलांनी शिरकाव केला आहे. अन्य खेळाप्रमाणेच या खेळाकडे पाहावे. त्यासाठी पिळदार शरीरयष्टीकडे लक्ष केंद्रित करून स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. अद्याप ही संख्या सिमित असली तरी ती वाढण्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा ‘मिस् इंडिया’ विजेती शरीरसौष्ठवपटू हर्षदा पवार हिने व्यक्त केली.
खडीओझरे (ता. संगमेश्वर) गावातील हर्षदा संतोष पवार हिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून मिस् मुंबई, मिस् महाराष्ट्र, मिस् इंडिया या स्पर्धेत बहुमान पटकाविला आहे. रत्नागिरीत कार्यक्रमासाठी आली असता तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. आई-वडिल, भावाचा पाठिंबा असल्यामुळेच यश संपादन केल्याचे ती म्हणाली. विजेंद्र ठसाळे यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यांनीच स्पर्धा व स्पर्धेतील सादरीकरणाबाबत माहिती देऊन तयारी करवून घेतल्याचे सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय, महाराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग नाममात्र आहे. त्या तुलनेत परदेशी महिलांचा सहभाग अधिक आहे. परदेशात स्पॉन्सरशीप मिळते. मात्र, भारतात त्याचा अभाव आहे. खर्चिक खेळ असल्याने महिला खेळाडूंनाही आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांनी न घाबरता आत्मविश्वासाने सहभागी होणे आवश्यक आहे. जिद्द, चिकाटीने यश नक्कीच आत्मसात करता येते, असेही हर्षदा म्हणाली.
हर्षदाला भविष्यात एशिया, जागतिक स्पर्धेत खेळायचं आहे. गतवर्षी दुबईत झालेली जागतिक स्पर्धा आर्थिक पाठबळाअभावी रखडल्याची खंत आहे. खासगी नोकरी करून आई,वडिल, भाऊ, मित्रमंडळींच्या पाठबळावर तिने पुन्हा जागतिक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. दररोज न चुकता सायंकाळी तीन ते चार तास तयारी करीत आहे. याशिवाय ‘डायट’वर ही तिचे लक्ष आहे. एशिया, जागतिक स्पर्धेतील यश हेच तिचे ध्येय आहे.