खड्ड्यांच्या निषेधार्थ रनागिरीत महिला काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:41+5:302021-09-09T04:37:41+5:30
रत्नागिरी : शहरात दिवसागणिक खड्ड्यांची संख्या वाढत आहे. खड्ड्यांनी रस्ते व्यापले असल्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांच्या ...
रत्नागिरी : शहरात दिवसागणिक खड्ड्यांची संख्या वाढत आहे. खड्ड्यांनी रस्ते व्यापले असल्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे नगर परिषदेसमोर मंगळवारी उपोषण करण्यात आले. खड्डे तातडीने न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा महिला काॅंग्रेस कमिटीतर्फे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील खड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्ता सापडत नाही व आता तर खड्डे वाढायलाही जागा नाही. सर्व रस्ते खड्डयांनी भरून गेले आहेत. आजतागायत रस्त्यांची व शहराची एवढी वाईट अवस्था कधी झाली नव्हती. आठवडा बाजाराकडून हाॅटेल विहार वैभवच्या समोरच्या रस्त्याची तर संपूर्ण चाळण झाली आहे. एस. टी. स्टॅंड परिसराची तर भयानक अवस्था झाली आहे. सर्वत्र हीच परिस्थिती आहे. जवळ जवळ वर्षभर ही अवस्था शहरातील रस्त्यांची आहे.
रस्ते खणल्यावर कमीत कमी ते सारखे करणे, ही जबाबदारी केवळ नगर परिषदेची आहे. काही ठिकाणी डबर आणून खड्डे बुजविले जात आहेत. या लाल डबराने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भरीस भर म्हणून पावसामुळे हे मोठमोठे खड्डे लाल पाण्याने भरून वाहात आहेत. लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ते नीट न केल्यास आम्हाला यापुढे कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेसचे सरचिटणीस रूपाली सावंत, सोशल मीडिया प्रदेश सचिव सुश्मिता सुर्वे, रत्नागिरी जिल्हा महिला काॅंग्रेस कमिटीच्या तेजस्विनी गाैतम सहभागी झाल्या होत्या.