Women's Day Special : चहाच्या टपरीवर होतो कीर्तीचा सूर्योदय-सूर्यास्तही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:44 PM2019-03-08T13:44:48+5:302019-03-08T13:53:13+5:30

दीड-दोन वर्षात रक्ताचे, जवळचे एकूण सातजण तिने गमावले असून, कुळ्ये कुटुंबीयांतील कीर्ती आता एकटीच राहिली आहे. मात्र, वडिलांनी सुरू केलेली चहाची टपरीच जणू तिची सोबतीण बनली आहे. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, काका गमावलेल्या कीर्त्तीला हक्काचे असे कोणीही नाही. परंतु, तिने स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले आहे. ती एम. ए.च्या प्रथम वर्षात शिकत असून, उदरनिर्वाहासाठी ती चालवत असलेल्या चहाच्या टपरीवर सूर्योदय व सूर्यास्तही होतो.

Women's Day Special: Festoon sunrise and sunset over tea season | Women's Day Special : चहाच्या टपरीवर होतो कीर्तीचा सूर्योदय-सूर्यास्तही

Women's Day Special : चहाच्या टपरीवर होतो कीर्तीचा सूर्योदय-सूर्यास्तही

Next
ठळक मुद्देदीड वर्षात कुटुंबातील सात सदस्य गमावलेल्या चहाविक्रेत्या कीर्ती कुळ्येची कहाणी...प्रत्येकवेळी दैवाशी झगडली अन् जिंकलीही...

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : दीड-दोन वर्षात रक्ताचे, जवळचे एकूण सातजण तिने गमावले असून, कुळ्ये कुटुंबीयांतील कीर्ती आता एकटीच राहिली आहे. मात्र, वडिलांनी सुरू केलेली चहाची टपरीच जणू तिची सोबतीण बनली आहे.

आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, काका गमावलेल्या कीर्त्तीला हक्काचे असे कोणीही नाही. परंतु, तिने स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले आहे. ती एम. ए.च्या प्रथम वर्षात शिकत असून, उदरनिर्वाहासाठी ती चालवत असलेल्या चहाच्या टपरीवर सूर्योदय व सूर्यास्तही होतो.

मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली गाव. राजेंद्र कुळ्ये या गावचे सरपंच होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी महामार्गालगत चहाची टपरी सुरू केली. राजेंद्र यांना दोन मुले कीर्ती व विशाल. त्यावेळी विशाल दहावीला होता. शिमगोत्सवाचे दिवस होते. रात्री साडेसातची वेळ, दोन्ही भावंडे घराकडे जात असताना एका भरधाव बसने दोघांनाही उडवलं.

कीर्ती थोड्या वेळाने शुध्दीवर आली. परंतु, विशाल रक्तबंबाळ झाला होता. कीर्तीने महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मदतीसाठी हात दाखवून विनवणी केली. जीवाच्या आकांतानं ती मदतीसाठी ओरडत असताना अनेक गाड्या आल्या परंतु न थांबता निघून गेल्या.

तासाभरात रक्तबंबाळ विशालची प्राणज्योत मालवली. त्यानंतर एका वाहनचालकाने कीर्तीला आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा, जो दहावीची परीक्षा देत असतानाच गेल्याच्या दु:खाने आई-वडील, आजी-आजोबा व्याकूळ झाले.

आजोबा तर दु:ख न सोसावल्याने आजारी पडले आणि त्यातच गेले. हाताशी आलेला मुलगा अपघातात गेलेला. घरात आई, पत्नी आणि मुलीसह चार माणसं. कीर्तीच्या वडिलांनी मुलाच्या जाण्याचा धसका घेतला व तेही हृदयविकाराच्या धक्क्याने गेले. आजीचे मुलावर आणि नातवावर विलक्षण प्रेम. मात्र, दोघांच्या मृत्यूनंतर तीही खचली.

पंधरा दिवसात आजीही गेली. यादरम्यान कीर्तीची मावशी आणि काकांचेही निधन झाले. मायलेकी मात्र अनेक आघात पचवून उभं राहण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र, कीर्तीची आई जास्त दिवस तग धरू शकली नाही.

नवऱ्यांच्या वर्षश्राध्दापूर्वीच तिनेही प्राण सोडले. दीड-दोन वर्षात हक्काची, मायेची सात माणसं कीर्तीला गमवावी लागली. तरीही कीर्ती जिद्दीने उभी राहिली. महामार्गावर भाड्याच्या जागेत असणाऱ्या चहाच्या टपरीवर कीर्ती पूर्वी बाबांना मदत करायची अन् आज ती एकटीच हे सर्व करत आहे.

लाखोंचा मिळणारा लाभही मिळाला नाही

कीर्तीचे वडील चहाची टपरी चालवत असतानाच चौपदरीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. लगतच्या काही टपरीचालकांनी आपल्या टपऱ्यांचे मूल्यांकन करून घेतले. त्यामुळे त्यांना सतरा लाख रूपये भरपाई मिळाली. कीर्तीचे वडील निरक्षर असल्याने त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि कळलं, त्यावेळी खूप उशीर झाला होता.

कठीण परिस्थितीशी झगडताना कीर्ती खंबीरपणे उभी राहिली आहे. सदैव हसऱ्या चेहऱ्याची कीर्ती आलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार चहा, वडापाव देते. टपरीवरील सर्व कामे पटापट हातावेगळी करून मोकळ्या वेळेत अभ्यासाचे पुस्तक हातात घेते. जणूकाही ही तिची आता रोजचीच दिनचर्या बनली आहे.

आरवली गावातच बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवनिर्माण महाविद्यालयात तिने पदवीसाठी प्रवेश घेतला. ाध्या ती एम. ए. प्रथम वर्षाची बहिस्थ विद्यार्थी म्हणून अभ्यास करीत आहे. दररोज पहाटे चार वाजता ती उठते. घरातील कामे आटोपून सात वाजता न चुकता टपरीवर हजर असते ती संध्याकाळी सातपर्यंत टपरीवरच असते.

Web Title: Women's Day Special: Festoon sunrise and sunset over tea season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.