महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला
By Admin | Published: May 13, 2016 11:52 PM2016-05-13T23:52:53+5:302016-05-13T23:52:53+5:30
अडूर, कोंडकारूळ : आठ कोटींच्या पाणी योजनांचे भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
गुहागर : वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या तालुक्यातील अडूर व कोंडकारूळ या गावांतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा आमदार भास्कर जाधव यांनी कायमचा उतरविला आहे. या दोन्ही गावांसाठी अनुक्रमे ३.५० कोटी व ४.५० कोटींच्या पाणीयोजना त्यांनी राबविल्या आहेत. या दोन्ही योजनांचे उद्घाटन आमदार जाधव यांच्या हस्ते पार पडले. पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याने यावेळी दोन्ही गावांमधील ग्रामस्थ व महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
वर्षानुवर्षे अडूर व कोंडकारूळ या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. कोंडकारूळच्या महिलांना तर तीन-चार किलोमीटरची पायपीट करून रणरणत्या उन्हातून पाणी आणावे लागत होते. मतदार संघात फिरत असताना आमदार जाधव यांना हे विदारक चित्र पाहावयास मिळाले होते. पण, प्रत्यक्ष गावात पाण्याचा उद्भव नसल्याने पाणीयोजना राबविणे शक्य नव्हते. या गावांची तहान भागविण्याचा एकच पर्याय होता, तो म्हणजे सुमारे साडेचार किलोमीटरवर असलेल्या नागझरी येथील पाणी आणणे. एवढ्या लांबून पाणी आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांची आवश्यकता होती. शासनाकडे पाठपुरावा करून आमदार जाधव यांनी या दोन गावांच्या स्वतंत्र पाणी योजनांसाठी अनुक्रमे ३.५० कोटी व ४.५० कोटी असे एकूण ८ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्यातून या दोन्ही योजना आज पूर्णत्वास गेल्या आहेत.
या योजनांचे उद्घाटन भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाधव म्हणाले की, अडूर आणि कोंडकारूळच्या महिलांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. या गावांमधील पाण्याचे हाल मी स्वत: पाहिले होते. त्याचवेळी मी शब्द दिला होता की, तुमच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा मी उतरवेन, तुमची पाण्यासाठीची वणवण थांबवेन, असे सांगितले होते. या दोन्ही गावांतील कार्यक्रमांना विलास वाघे, सुनील जाधव, पूर्वा ओक, पांडुरंग कापले, सुरेश सावंत, रामभाऊ शिगवण, शैलजा गुरव, उमेश आरस, प्रशांत पोळेकर, जयदेव मोरे, नवनीत ठाकूर, शामराव दिवाळे, यशवंत धावडे, प्रवीण ओक, एकनाथ हळये, प्रमोद हळये उपस्थित होते. (प्रतिनिधी)