अर्जुना नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:17+5:302021-04-28T04:33:17+5:30
लांबी - ३०० मीटर रुंदी - ३० मीटर लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : मुंबई-गाेवा महामार्गाचे राजापूर शहरातील काम सध्या ...
लांबी - ३०० मीटर
रुंदी - ३० मीटर
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : मुंबई-गाेवा महामार्गाचे राजापूर शहरातील काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील वरचीपेठ येथील अर्जुना नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम अद्याप बाकी असल्याने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही, तरीही संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई - गोवा महामार्गावरील सर्वात उंच पूल म्हणून राजापूर शहरानजीक अर्जुना नदीवर उभारण्यात येणारा पूल असून, आता पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या असलेले काम पाहता, तो सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही. पुलाची उभारणी करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने पुलाचे काम झपाट्याने झाले आहे.
राजापूर शहरातून हा महामार्ग राजापूर बस स्थानकाकडून पुढे कै. मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल व महामार्गावरील दर्ग्याच्या मधून पुढे सारंगबागेतून थेट अर्जुना नदीवरील पुलावर जात आहे. पुढे सुमारे ३० मीटर लांबीच्या पुलाने थेट गाडगीळवाडी येथे सध्या असलेल्या महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे राजापूर दर्ग्याजवळून पुढे कब्रस्तान, शासकीय विश्रामगृह व पुढे वरचीपेठ ब्रिटिशकालीन पूल हे सुमारे ७०० ते ८०० मीटर इतके अंतर कमी होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन पुलापासून अर्जुन नदीपात्रात शीळकडे जाताना पुढे सुमारे १०० ते १२५ मीटर लांबीवर हा नवीन पूल बांधला जात आहे.
सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेला ब्रिटिशकालिन पूल वाहतुकीला धोकादायक झाल्याने, या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यातील अतिवृष्टीत हा पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून नवीन पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.
.........................................
पुलामुळे ११ वेडीवाकडी वळणे कमी
सारंग बागेतून थेट अर्जुना नदीवरून पुढे गाडगीळवाडीतून सध्याच्या महामार्गाला हा पूल जोडला जाणार आहे. या दुहेरी पुलाला एकूण १६ पीलर असून, अर्जुना नदीपात्रातून सुमारे ३६ मीटर उंचीचे दोन पुलांसाठी चार पीलर टाकले आहेत, तर उर्वरित पीलर हे प्रारंभी व शेवट आणि मध्यभागी टाकले आहेत. यात नदीपात्रातील लांबी ही २२० मीटर तर जमिनीवरील लांबी ही सुमारे ८० मीटर इतकी राहणार आहे. या पुलामुळे ११ वेडीवाकडी अवघड आणि छोटी मोठी वळणे कमी होणार आहेत.