कळंबणीतील सिटी स्कॅन सेंटरचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:00+5:302021-07-14T04:37:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या सिटी स्कॅन सेंटर इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या सिटी स्कॅन सेंटर इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यात सिटी स्कॅनच्या सेवेअभावी रुग्णांना अन्य ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. यासाठी आर्थिक भुर्दंडही रुग्णांना सहन करावा लागत होता. ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीक सिटी स्कॅन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाकडे पाठवला होता. आमदार कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रस्तावास मंजुरी मिळून या इमारतीसाठी आरोग्य मंत्रालय योजनेतून १ कोटी तर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभागाने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे काम हाती घेतली. या ठिकाणी १,७०० चौरस मीटर इमारत उभारण्यात येणार असून आमदार कदम यांनी ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार सिटी स्कॅन सेंटर इमारत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इमारतीचे काम पूर्ण होताच तत्काळ सिटी स्कॅन सेंटर कार्यान्वित होणार आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. सिटी स्कॅन सुविधेनंतर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात डायलेसीस सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली.