विकासाच्या २१ कोटींच्या कामात पालिकेचा खो : सामंत
By admin | Published: July 15, 2014 12:07 AM2014-07-15T00:07:59+5:302014-07-15T00:15:38+5:30
वाद संपेचना : मुख्याधिकाऱ्यांनी मागवले मार्गदर्शन
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने शहर विकासाच्या २१ कोटींच्या कामांमध्ये खो घातल्याचे समजल्यावर आपण त्याबाबत माहिती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ३०८ नियमांतर्गत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार ही कामे करण्याबाबत मार्गदर्शन येताच निर्णय घेतला जाईल. या २१ कोटींच्या कामांसाठी आतापर्यंत पालिकेकडे साडेनऊ कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
शिर्के प्रशालेजवळील मुख्य रस्त्यावरील स्काय वॉक, पालिका सफाई कामगारांच्या घरांचा ‘श्रमसाफल्य प्रकल्प’, तोरण नाल्याचे कॉँक्रीटीकरण व दफनभूमी या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. स्काय वॉक प्रकल्पासाठी नगरपरिषदेचा नाहरकत दाखला मिळाला नसल्याची चर्चा होती. परवानगीचा दाखलाच पालकमंत्र्यांनी पत्रकारांसमोर ठेवला. स्कायवॉक, तोरणनाला कामांसाठीची १० टक्के रक्कम पालिकेने भरली आहे. विकासकामांसाठी कागदपत्र दिली, तर निधी मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाहीे. मंत्री जितेंद्र आव्हाड हे येत्या आठवड्यात रत्नागिरीत येणार आहेत. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालीसह पाच ग्रामपंचायतींना प्रायोगिकतत्त्वावर कचरा उचलण्यासाठी गाड्या दिल्या जाणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांसाठीही चांगल्या गाड्या देण्याचा प्रस्ताव आहे. येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी डी. व्ही. कार घेण्याचा विषय पुढे आला. मात्र, एक इनोव्हा व अन्य एक अशा दोन डी. व्ही. कार असल्याने नव्याने घेण्याची गरज नसल्याचे आपण सांगितल्याचे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)