जैतापूर, कुंभवडे आरोग्य केंद्राचे काम अजून अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:07+5:302021-06-10T04:22:07+5:30
राजापूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे जनता आणि प्रशासनही हतबल झाले आहे. तालुक्यातील अपुऱ्या ...
राजापूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे जनता आणि प्रशासनही हतबल झाले आहे. तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य सेवा-सुविधांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, त्याचवेळी आरोग्य सुविधांच्या कामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे दोन आरोग्य केंद्रांच्या इमारती रखडल्या आहेत. राजापूर तालुक्यात जैतापूर व कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामांमध्ये झालेल्या गैरप्रकारातून हे दुर्लक्ष प्रकर्षाने पुढे येत आहे.
आमदार राजन साळवी, जिल्हा परिषदेतील विरोधी गटनेते व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करण्याचीही तयारी केली जात आहे.
तालुक्यातील जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दुरूस्ती आणि मुख्यत्वेकरून ड्रेनेज पाईप दुरुस्ती या कामाचा फलक या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही दुरुस्ती झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील ड्रेनेज पाईपही जाम झाला असून, नाईलाजास्तव महिला कर्मचाऱ्यांना अन्य शौचालयांचा वापर करावा लागत आहे. मात्र, असे असतानाही ३१ मार्च २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राची छप्पर दुरूस्ती आणि ड्रेनेज पाईपलाईनचे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात आल्याचा फलक ठेकेदाराकडून आरोग्य केंद्रात लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे काम न करताच हे पैसे लाटण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
एकीकडे जैतापूरला काम न करताच ते पूर्ण झाल्याचा फलक लागला आहे तर कुंभवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती गेली तीन वर्षे रखडली आहे. कोरोनासारख्या संकटातही याठिकाणी काम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अनेक समस्यांचा सामना करत आपली सेवा बजावत आहेत. प्रसुतीगृह आणि शस्त्रक्रिया विभाग इमारतीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामीण भागातील महिलांना प्रसुतीसाठी राजापूर अथवा रत्नागिरी गाठावे लागत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून २०१७-१८ या आर्थिक वर्षात या आरोग्य केंद्राची मुख्य इमारत दुरूस्ती, शवविच्छेदन कक्ष व ऑपरेशन थिएटर दुरूस्तीचे काम मंजूर झाले होते. त्यासाठी सुमारे १५ लाख ७२ हजार २६७ रुपये मंजूर झाले. प्रत्यक्षात हे काम १५ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आले. मात्र, अजूनही ते संथगतीने सुरूच आहे.
कोरोना संकट काळात या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर चौरे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. कुंभवडे परिसर कोरोनामुक्त ठेवताना त्यांनी जनजागृती करत अपुऱ्या सेवा-सुविधांमध्येही रूग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे राजापुरात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न दाखविले जात आहे, तर दुसरीकडे आहे त्या आरोग्य यंत्रणांच्या दुरुस्तीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.