जुन्या १४ पुलांच्या कामातील अडसर दूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:39 AM2019-06-01T11:39:12+5:302019-06-01T11:41:00+5:30
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती.
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच्या ठेकेदारांनी अर्धवट सोडली होती. त्यामुळे आता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच ही कामे वर्ग करण्यात आली आहेत. मात्र, जुने ठेकेदार व चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार हे संयुक्तरित्या या पुलांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर तातडीने पूल उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण भागात चौपदरीकरणाचे काम वेगात आहे तर रत्नागिरीच्या दोन टप्प्यांमध्ये रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, अन्य टप्प्यांच्या तुलनेत हे काम खूपच मागे आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
मोदी सरकारच्या काळात चौपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. आता पुन्हा एकदा मोदी सरकारच केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुलांच्या कामातील अडसर दूर झाला असला तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना भराव नुसताच ओढून ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी ते आरवली या मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण करताना भराव, कटींग्जची माती ही त्याचठिकाणी रस्त्यावर दाबून ठेवण्यात आली आहे. मात्र, पावसात ही माती पुन्हा रस्त्यावर पसरण्याचा धोका आहे.
पावसाळ्यातील धोका कायम
महामार्गावरील १४ पुलांचे काम पूर्णत्वासाठी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच सोपविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही पुलांचे काम अपूर्ण आहे. जुन्या ब्रिटीशकालीन पुलांचे आयुष्य संपलेले असल्याने व नवीन पुलांचे काम पूर्ण झालेले नसल्याने जुन्या पुलांचा पावसाळ्यातील धोका कायम आहे.
निविदांना अल्प प्रतिसाद
पुलांचे बांधकाम मूळ ठेकेदारांनी सोडल्यानंतर महामार्ग विभागाने पुलांच्या कामासाठी दोनवेळा निविदाही काढल्या. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुलांच्या पूर्णत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदारांकडेच पुलांचे काम वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम आता त्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. परिणामी पुलांच्या कामातील अडसर दूर झाला आहे.
कामांची विभागणी
चौपदरीकरणाचे काम लवकर व्हावे, यासाठी हे काम वेगळ्या ठेकेदारांकडे तर मार्गावरील जुन्या पुलांच्या उभारणीचे काम अन्य ठेकेदार कंपन्यांकडे सोपविण्यात आले होते. परंतु, पुलांचे काम घेतलेल्या संबंधित ठेकेदार कंपन्यांनी उपठेकेदार नियुक्त केले. त्यांनी पुलांची कामेही सुरू केली. मात्र, उपठेकेदारांना वेळेत कामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुलाचे पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पुलांचे काम अर्धवट स्थितीत आहे.
अर्धवट काम सोडले
मुळातच चौपदरीकरण काम रडत-रखडत सुरू असताना ब्रिटीशकालीन पुलांचे काम ठेकेदारांनी अर्धवट स्थितीत सोडल्याने चौपदरीकरणाच्या कामात मोठा अडसर निर्माण झाला होता. मूळ ठेकेदारांनी हे काम करण्यास नकार दिल्यानंतर पुलांचे उर्वरित काम सध्या चौपदरीकरणाचे काम करणाºया ठेकेदारांकडे सोपवावे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. परंतु, त्याचा पाठपुरावा झाला नाही.