मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:56 PM2022-01-21T17:56:38+5:302022-01-21T18:08:06+5:30
काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोकणी माणसाच्या सहनशीलता संपत आली आहे.
काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाणार असून, २७ जानेवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावर पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लांजा, पाली, हातखंबा, आरवली, चिपळूण या ठिकाणी चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार आहे.
खासदार राऊत, मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना उलटूनही ठेकेदाराने लक्ष दिलेले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महामार्गाचे काम ठप्पच आहे. त्यामुळे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेडमध्ये आमदार योगेश कदम, चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव व आमदार निकम, हातखंबा व पाली येथे मंत्री सामंत व लांजात आपण याचे नेतृत्व करणार असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात खासदार विनायक राऊत स्वत: सहभागी होणार आहेत. यावेळी महामार्गावरील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारीही आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनीही परखड मते व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जगदीश राजापकर, संजू साळवी, रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.