पिंंपळवाडी पाटबंधारे प्रकल्पाचे काम अपूर्णच
By admin | Published: April 14, 2016 07:51 PM2016-04-14T19:51:34+5:302016-04-14T19:52:34+5:30
तेहतीस वर्षांची प्रतीक्षा... : पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
रत्नागिरी : पिंंपळवाडी (खोपी) पाटबंधारे प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. ३३ वर्षांपूर्वी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही हे धरण अपूर्ण आहे. याची गंभीर दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली असून, कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाची ते स्वत: पाहणी करणार आहेत.
या धरणाचे काम १९८० साली सुरू करण्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ५ कोटी २१ लाखांची प्रशासकीय मान्यताही मिळाली. १९८२ - ८३ साली या प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन प्रकल्पाच्या किमतीत २३ कोटी ८७ लाख इतकी वाढ करण्यात आली.
सन १९९९ - २०००मध्ये प्रकल्पाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करून ही रक्कम ४६ कोटी ९० लाख करण्यात आली. २००७ - ०८मध्ये तृतीय सुधारणा करून रक्कम ८७ कोटी इतकी करण्यात आली. या प्रकल्पावर आतापर्यंत ७५ कोटी रुपये खर्च झाले असून, ३३ वर्षांच्या कालावधीनंतरही प्रकल्पाचे काम अपूर्ण अवस्थेत
आहे.
उजवा कालवा २२ किलोमीटरचा आणि डावा कालवा २० किलोमीटरचा आहे. यापैकी अद्याप फक्त ६ किलोमीटरपर्यंतचेच काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. या प्रकल्पामधून ३०० मेगावॅट विद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार होती. परंतु हा प्रकल्पही अपूर्ण आहे. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष अनंत भोसले, मुख्य कार्यवाह देवराम भोसले, कार्याध्यक्ष प्रमोद भोसले यांनी मंगळवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी तहसीलदार अमोल कदम, उपसचिव बेलसरे, सहाय्यक अभियंता अरुण काळोखे, रा. बा. क्षीरसागर आदी उपस्थित होते.
डाव्या व उजव्या कालव्यांची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असा आग्रह धरला. धरण पूर्ण करून शेतीच्या सिंंचनासाठी पाणी द्यावे व सातगावातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, विद्युत प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात करावी. खेड तालुक्याला विद्युत भारनियमनातून मुक्त करावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या प्रकल्पातील शेकडो धरणग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे शिष्टमंडळाने राज्यमंत्री वायकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
याची गंभीर दखल घेत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अपूर्ण कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर या प्रकल्पाची स्वत पाहणी करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी शिष्टमंडळास दिले. (प्रतिनिधी)