पथदीपांची कामे अर्धवटच
By admin | Published: October 1, 2016 11:55 PM2016-10-01T23:55:54+5:302016-10-02T00:09:51+5:30
योजनेची ‘ऐसी की तैसी’ : नवबौध्द, चर्मकार वाड्यावस्त्या अंधारात
रत्नागिरी : जिल्ह््यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द वाड्यावस्त्यांमध्ये पथदीप बसविण्याच्या योजनेचे महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे बारा वाजले आहेत. अनेक वाड्यांमध्ये पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. तर काही वाड्यावस्त्यांमधील पथदीप बसविण्याची कामे अर्धवट सोडण्यात आल्याने या वाड्यावस्त्या अजूनही अंधारातच आहेत.
गेली कित्येक दशके नवबौध्द आणि चर्मकारवाड्या, वस्त्या या अंधारात चाचपडत आहेत. या वाड्यावस्त्या पथदिव्यांच्या माध्यमातून उजळाव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पथदीप उर्जीकरण योजना सुरु केली. सन २०११ पासून गेली सहा वर्ष ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेच्या फायद्यापासून या वाड्यावस्त्या वंचितच राहिल्या आहेत.
जिल्ह्यात बौध्दवाड्या व चर्मकारवाड्या आजही विकासापासून दूरच आहेत. या वाड्यावस्त्यांमध्ये आजही रात्रीच्यावेळी अंधारात चाचपडत जावे लागते. त्यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या वाड्यावस्त्यांना पथदीपांची सोय करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सन २०११ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ९९ बौध्दवाड्या आणि चर्मकारवाड्यांच्या पथदीपांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत महावितरणकडे पाठविण्यात आले होते. या वाड्यावस्त्यांमध्ये सुमारे २०५९ पथदीप मंजूर करण्यात आले होते.
हे मंजूर करण्यात आलेले पथदीप बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून महावितरणला लाखो रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरणने यातील काही वाड्यावस्त्यांमध्ये पथदीपांची कामे सुरु केली मात्र ती अर्धवट ठेवण्यात आली. तर अनेक वाड्यावस्त्यांमधील कामे अजूनही सुरु करण्यात आलेली नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराबद्दल समाजकल्याण समितीच्या सभेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महावितरण आपल्या कारभारात कधी सुधारणा करणार? असा सवाल आता या वाडीवस्तीतील ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)
संताप : महावितरणची कामे खोळंबली
तालुका वाड्या मंजूर दिवे
दापोली १३ १७३
रत्नागिरी १२ २५८
संगमेश्वर २२ ३७४
चिपळूण १० ३३२
गुहागर ७ १५१
राजापूर ६ ७९
मंडणगड १४ १३०
खेड ९ १३४
लांजा ५ ७५
एकूण ९९ २०५९