बोरज येथील टोलनाक्याचे काम मार्च अखेर पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:44 PM2020-09-26T16:44:31+5:302020-09-26T16:46:04+5:30
लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कामगार परत आल्याने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
खेड : लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कामगार परत आल्याने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. महामार्गावरील बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
सर्व आवश्यक सुविधांसह हा टोलनाका मार्च २०२१ अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात दिल्या जाईल, अशी माहिती महामार्ग चौदपरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत बकले यांनी दिली.
महामार्गावरील कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटर महामार्गाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे. कंपनीकडून ४४ किलोमीटरपैकी सुमारे ३० किलोमीटरचे काम पूर्णत्वाला गेले आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणचे काम रखडले आहे. मात्र, मे २०२१ अखेर कशेडी ते पशुराम दरम्यानच्या ४४ किलोमीटर महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाईल, असे कंपनीकडून सांगितले जात आहे.
लॉकडाऊन दरम्यान चौपदरीकरणाचे काम करणारे परप्रांतीय कामगार निघून गेल्याने कामामध्ये थोडी शिथिलता आली होती. मात्र, निघून गेलेले कामगार आता पुन्हा परतले आहेत. त्यामुळे पाऊस थांबताच चौदपरीकरणाचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष
बोरज येथील टोलनाक्यावर वाहनांना ये-जा करण्यासाठी प्रत्येकी ८ अशा १६ लाईन्स असणार आहेत. कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.