गुहागरात महामार्गाच्या रेखांकनाचे काम रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 06:51 PM2017-10-12T18:51:15+5:302017-10-12T18:56:39+5:30
गुहागर - विजापूर महामार्ग रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याशेजारील ग्रामस्थांना कोणीतीही सूचना न देता रस्त्याच्या मध्यावरून दोन्ही बाजूच्या अंतराचे रेखांकन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना गुहागर शहरातील ग्रामस्थांनी जाब विचारत हे काम रोखले.
गुहागर , दि. १२ : गुहागर - विजापूर महामार्ग रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याशेजारील ग्रामस्थांना कोणीतीही सूचना न देता रस्त्याच्या मध्यावरून दोन्ही बाजूच्या अंतराचे रेखांकन करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना गुहागर शहरातील ग्रामस्थांनी जाब विचारत हे काम रोखले. रस्त्याशेजारील जनतेला कोणतीही कल्पना नसताना ठेकेदाराकडून अशा प्रकारच्या रेखांकनने (मार्किंग) येथील ग्रामस्थ संभ्रमित झाले असून, यातून विरोधाची भूमिका वाढू लागली आहे.
गुहागर - कराड विजापूर महामार्ग रूंदीकरणाबाबत शासन स्तरावरून शहरवासीयांनी कोणतीही कल्पना दिलेली नाही. आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या रस्ता रूंदीकरणामध्ये ग्रामस्थांनी समझोत्याने कोणताही मोबदला न घेता रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमिनी दिल्या.
मात्र, महामार्गाबाबत येथील जनतेलाच माहिती नसताना ठेकेदाराचा कर्मचारीवर्ग अचानक रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुला सुरू केलेल्या रेखांकनामुळे ग्रामस्थ संभ्रमित झाले आहेत. या महामार्गाची सुरूवात गुहागर शहर बाजारपेठेतील नाक्यापासून होणार आहे.
येथील रस्ता अरूंद आहे. मात्र, त्यापुढे तब्बल सात मीटरचा रस्ता आहे. असे असताना नक्की कशा प्रकारे व किती प्रमाणात रूंदीकरण होणार आहे, याबाबतची माहिती प्रशासनाच्यावतीने येथील जनतेपर्यंत पोहचवलेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वस्ती असून, याबाबत प्रशासनाची नक्की कोणती भूमिका आहे, याबाबत कोणीही पुढे आलेला नाही.
अचानकपणे सुरू झालेल्या मोजणी व मार्किंगमध्ये संबंधीत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम घेतले असून, रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुला १० मीटरपर्यंतचे अंतर मोजून यामध्ये झाडे व खांब किती येत आहेत, याची मोजणीदाद करत आहोत.
या ठिकाणी झाडांवरही रिमार्क करत असल्याचे सांगण्यात आले. यावर येथील ग्रामस्थांनी सदर रेखांकन करताना व रस्त्याशेजारील ग्रामस्थांच्या जागेमध्ये जाताना संबंधीत कर्मचाऱ्यांकडे कोणतेही अधिकारपत्र नाही. यामुळे आमच्या परवानगीशिवाय जागेमध्ये प्रवेश करू नये, अथवा कोणताही रिमार्क मारू नये. आम्हाला याबाबत कोणतीही सूचना नाही, असे म्हणत दोन्ही बाजूचे अंतर मोजणीस व रेखांकनाकरिता गुहागर शहरात ग्रामस्थांच्यावतीने विरोध करण्यात आला.