श्रमाची प्रतिष्ठा राखणाऱ्या महिलांचे कार्य कौतुकास्पद : विजय कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:34 AM2021-09-26T04:34:59+5:302021-09-26T04:34:59+5:30
अडरे : शारीरिक श्रम, मेहनत, कष्ट करणाऱ्यांची आणि त्या प्रति निष्ठा राखणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दादरच्या महिलांनी ...
अडरे : शारीरिक श्रम, मेहनत, कष्ट करणाऱ्यांची आणि त्या प्रति निष्ठा राखणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दादरच्या महिलांनी स्वच्छतेच्या कार्यात दिलेल्या योगदानाला तोड नाही. मात्र, दादर गावाच्या महिलांनी ग्रामस्वच्छतेसारख्या अतिशय पवित्र कार्यात सहभाग घेऊन ऐतिहासिक काम केले आहे, असे गौरवाेद्गार विकास सहयाेग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास आणि संशोधन संस्था सांगोला आणि विकास सहयोग प्रतिष्ठान मुंबईतर्फे चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाची चिपळूण तालुक्यातील दादर गावामध्ये स्वच्छता दूतांच्या आभार कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. चिपळूण तालुक्यातील निरबाडे, तिवडी, दादर आणि कादवड या गावी सुमारे १०० महिला पुरुषांनी १० दिवस ग्रामस्वच्छतेसाठी आपल्याला गावामधील सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करून मोठे योगदान दिले. त्यामुळे या स्वच्छता दूतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादर ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी कळकवणे दादरच्या सरपंच कविता आंबेड, सदस्य प्रवीण पवार, चिपळूण तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष विलास सकपाळ, माजी सरपंच जयश्री सकपाळ, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ सकपाळ, दादर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर सकपाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती सकपाळ, विकास सहयोग प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक वैभव कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ सकपाळ यांनी तर आभार विलास सकपाळ यांनी मानले.