चिपळुणात विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:58+5:302021-08-18T04:37:58+5:30
चिपळूण : विद्युत पुरवठा सुरू असतानाही विद्युत खांबावर चढून महानेटची केबल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसून मृत्यू ...
चिपळूण : विद्युत पुरवठा सुरू असतानाही विद्युत खांबावर चढून महानेटची केबल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्यासुमारास घडली. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्याने प्राण सोडले. सचिन संभाजी यादव (वय ४२, रा. चाफवली, संगमेश्वर) असे या कामगाराचे नाव आहे.
सचिन यादव व काही सहकारी मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्यासुमारास चिपळूण पंचायत समितीसमोरील परिसरात महानेटची केबल टाकण्याचे काम करत होते. ही केबल चिपळूण तहसील कार्यालय ते चिंचघरी ग्रामपंचायतीकडे नेली जाणार आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम शहरात रेंगाळले आहे. त्यामुळे महानेटची केबल भूमिगत पद्धतीने टाकताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंकडील इमारतीवरून ही केबल तात्पुरत्या स्वरूपात टाकून ती पुढे नेण्यात येणार होती.
पंचायत समितीसमोर महामार्गालगत महावितरण कंपनीचा जुना विद्युत खांब आहे. या विद्युत खांबावरून केबल नेत असताना विद्युत पुरवठा सुरू असलेल्या विद्युत खांबावर सचिन यादव चढले होते. ती केबल विद्युत खांबावरून टाकताना विद्युत वाहिनीचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सचिन यादव काहीच हालचाल करीत नव्हते. त्यांना त्या अवस्थेत पाहून सहकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तत्काळ यादव यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.