पाण्यामुळे उघड्या माळरानावर संसार

By Admin | Published: March 27, 2016 10:01 PM2016-03-27T22:01:47+5:302016-03-28T00:18:22+5:30

कोंडमळा-धनगरवाडी : वीजबिल न भरल्याने योजना बंद; बोअरवेलला पाणीच नाही

The world on the open nods of water | पाण्यामुळे उघड्या माळरानावर संसार

पाण्यामुळे उघड्या माळरानावर संसार

googlenewsNext

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे - कोंडमळा - धनगरवाडी येथील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. यापूर्वी तेथील वाडीला अनारी-अडरे येथे राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनेतून धनगरवाडा तसेच कोंडमळा गावाला पाणी पुरवले जात होते. पण, त्या योजनेच्या विजेचे बिल न भरल्याने ती योजना बंद झाली. त्यानंतर तेथील धनगरवाडीतील ग्रामस्थांनी पैसे काढून ठिकठिकाणी बोअरवेल खोदली आहे. पण, त्याला पाणीच नसल्याने त्या कोरड्याच राहिल्या आहेत. सध्या येथील कुटुंबाना पाण्याअभावी मोकळ्या माळरानावर संसार थाटावा लागत आहे.
जिल्ह्यात पाण्याचे संकट जाणवू लागले आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबर पाण्याचा दाह अधिक अधिक आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागात मैलोन्मैलचा प्रवास करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, कोंडमळा - धनगरवाडीतील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळून जाते. याठिकाणी पन्नास घरांची वस्ती असून, सध्या तिथे पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. सध्या चिपळुणातून पाण्याचा टँकर विकत आणावा लागतो. एका टँकरला ३ हजार रुपये खर्च करावा लागतो. याठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे नेते येऊन गेले, त्यांच्या आश्वासनाशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही. आता आम्ही सध्या लहान मुलांच्या आंघोळीसाठी वापरलेले पाणी साठवून ते परत वापरात आणले जाते. आम्ही आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अनेक वेळा तहसील कार्यालयात फेऱ्या मारल्या. परंतु तिथे आमची कुणीही दखल घेत नाही. आमच्याच बाबतीत असे का? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.
हा समाज अनेक भागात दुसऱ्याची शेती करून आपला उदारनिर्वाह करीत असतो. दुग्ध व्यवसायावर या समाजाची अर्थव्यवस्था चालते. तूटपुंज्या मिळकतीवर घर चालवत असताना आपले राहाते घर सोडून पाण्याच्या शोधात जाण्याची वेळ येत आहे. दरवर्षी या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळत आहे. पण, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने धनगरवाड्यांमधील ग्रामस्थांना हलाखीतच आपले जीवन व्यथित करावे लागत आहे. (वार्ताहर)


शिक्षणाचे पैसे पाण्याला : आजही मोलमजुरी
मुलांच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी साठवून ठेवलेले पैसे पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. आता त्यांची मुले शिक्षणासाठी शाळेत जातात तर तिथे त्यांच्या फीचा प्रश्न निर्माण होत आहे. मोलमजुरी करून आणलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी ठेवण्यात येत आहे. पण, हाच प्रश्न आता पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

घर सोडून माळरानावर थाटला संसार
आभाळाच्या छताखाली ऊन, वाऱ्याचे पांघरून घेत कोंडमळा सावर्डेच्या उघड्या माळरानावर संसार थाटून धनगर बांधव आपले जीवन व्यथित करीत आहेत. यंदाही वस्तीला आपले घर सोडण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अडरे, अनारी, टेरव, सावर्डे, कोंडमळा येथील वस्त्यांमध्ये आहे.

Web Title: The world on the open nods of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.