जगबुडीच्या जोडरस्त्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:17 PM2019-07-03T12:17:26+5:302019-07-03T12:20:34+5:30
भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूलाच्या जोडरस्त्याला शनिवारी मोठ-मोठी भगदाडे पडली होती. नवीन पुलाच्या जोडरस्त्याची झालेली दुर्दशा पाहून जनप्रक्षोभ उसळला होता. यामुळे महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी पुलाच्या जोडरस्त्याच्या दुरुस्तीला रविवारपासून सुरुवात केली आहे.
खेड : भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूलाच्या जोडरस्त्याला शनिवारी मोठ-मोठी भगदाडे पडली होती. नवीन पुलाच्या जोडरस्त्याची झालेली दुर्दशा पाहून जनप्रक्षोभ उसळला होता. यामुळे महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी पुलाच्या जोडरस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.
भरणे येथील जगबुडी नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिश कालीन पुलाला पर्याय म्हणून नवीन पुल उभारण्यात आला आहे. या पुलाचा जोडरस्ता शनिवारी धोकादायक परिस्थितीत खचल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्यात जुन्या धोकादायक ब्रिटिशकालीन पुलाला पर्याय म्हणून या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू होती. परंतु नवीन पुलाच्या जोड रस्त्याचा दर्जा पावसाच्या अवघ्या तीन दिवसात दिसून आल्याने नागरिक, राजकीय नेते संतप्त झाले.
राष्ट्रवादी, मनसे यांनी आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. जगबुडी नदीवरील नवीन पूलाचा जोड रस्ता सुरक्षित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी शतीर्चे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने काम पूर्ण होऊन नवीन पूल व सुरक्षित जोड रस्ता देखील बनविण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.