काळजी, भीती अन् आपुलकी - मुंबईकरांचे स्वागत; माणसातील कटुता दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 01:12 PM2020-06-01T13:12:10+5:302020-06-01T13:14:57+5:30
अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये ...
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : मुंबईत कामानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांची गावकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे, तर मुंबईकर गावी येत असल्याने मनामध्ये भीतीचे काहूर माजले आहे. तरीदेखील गावी येणाऱ्यांचे लोंढे थांबत नसल्याने गावी आलेल्यांची आपुलकीने व्यवस्थाही केली जात आहे. कोरोनामुळे मुंबईकर आणि गावकरी यांच्यात दुरावलेले नातेसंबंध आता सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नागरिक नोकरी, धंद्यानिमित्त मुंबई, पुण्यात कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून स्वत:सह कुटुंबाच्या काळजीने मिळेल त्या वाहनाने, वेळेप्रसंगी चालत अनेकांनी गावाची वाट धरली. त्यामुळे गावाकडे येणाऱ्यांचे लोंढे वाढले. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार १७२ नागरिक दाखल झाले आहेत. अजूनही अनेकजण येत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने त्यांच्यासाठी शाळा, समाज मंदिर, गावातील रिकामी घरांची व्यवस्था केली. गावात येणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण वाढल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरूवातीला विरोधाचे सूर उमटू लागले. भीतीमुळे गावाच्या सीमा बंद झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी मुंबईकरांची काळजीही गावकऱ्यांना सतावत होती. मुंबईकरांनी घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, अशी आशा गावकरी करत होते.
तरीही जीवाच्या काळजीने मुंबईकर गावी दाखल झाले. गावी आलेल्या मुंबईकरांना सापत्न वागणूक न देता गावकरी एकत्र आले. गावाच्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, समाज मंदिर सज्ज ठेवली. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची घरे उभारून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. मुंबईकर आपलेच आहेत, असे मानून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे गावांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
- पाली गावात मुंबईकरांच्या स्वागतासाठी रंगले रस्ते
मुंबईत असलेल्या अपुऱ्या सुविधा व गावाकडे वाटणारी सुरक्षितता यामुळे मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावी कोकणात धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असल्याने सुरूवातीला गावकरी थोडेफार बिथरले होते. रत्नागिरी तालुक्यातील पाली गावात गावकऱ्यांनी आपल्या गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर घोषवाक्य लिहून त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी गावकरी सज्ज आहेत.
- मुुंबईकरांकडून स्वच्छता
गावात आलेल्या मुंबईकरांना शाळा किंवा समाज मंदिरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी शाळांमध्येच १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ दिवस बसून करायचे काय? असे ठरवून मुंबईकरांनी शाळेची साफसफाई करण्याचा वसा हाती घेतला आहे. राजापूर, गुहागर तालुक्यातील शाळांमध्ये स्वच्छतेचे काम हाती घेऊन शाळेचे रूपडेच पालटून टाकले आहे.
- गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभारली तात्पुरती घरे
गुहागर तालुक्यातील कोळवली गावाने एक नवा आदर्श निर्माण करत तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील प्रत्येक वाडीने जबाबदारी घेऊन आपल्या वाडीतील चाकरमान्यांसाठी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामस्थांनी शेतात लाकडी खांब उभे केले, त्यानंतर झाडांच्या फांद्यापासून भिंती आकाराला आल्या, ऊन-पावसापासून रक्षण व्हावे, यासाठी पत्र्याचे छप्पर घालण्यात आले.
स्वत:ची दिली घरे
एकीकडे मुंबईकरांना विरोध असतानाच मुंबईकर आपलेच आहेत या भावनेने मुंबईकरांना स्वत:चे घरही दिली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील देवस्थळी कुटुंबियांनी आपले रिकामे घर, तर माभळे काष्टेवाडीतील संतोष काष्टे यांनी राहती दोन घरे मुंबईकरांना दिली आहेत. जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तर तुरळ सुवरेवाडी येथे गावाबाहेर झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाला आपल्या घरी नेले.
गावी येणाऱ्या मुंबईकरांना चांगली वागणूक मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून समन्वय पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामस्थ आहेत. त्यामुळे मुंबईकर व गावकरी यांच्यात समन्वय साधून तंटे न होण्यास मदत झाली आहे. मुंबईकरांचे स्वागतच होत आहे.
- विशाल गायकवाड,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.